अधिकार नाही, निधी नाही हे तुणतुणे नको!; मुख्यमंत्र्यांनी टोचले जि. पं. सदस्यांचे कान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 01:37 PM2023-04-26T13:37:00+5:302023-04-26T13:37:24+5:30
उत्तर जिल्हा विकास आराखड्याचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जिल्हा पंचायत सदस्यांना काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. आम्हाला अधिकार नाही, निधी नाही असे तुणतुणे वाजवू नका. केंद्राकडे योजना पाठवून निधी मिळवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी झेडपींना केले.
उत्तर जिल्हा विकास आराखड्याचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल झाले. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पंचायत सचिव मिनिन डिसोझा, उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष सिध्देश श्रीपाद नाईक, अजय गावडे याप्रसंगी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या पंधरा दिवसांत होईल व या बैठकीत वरील आराखडा ठेवला जाईल. गोशाला चालवा, भटक्या गुरांची जबाबदारी घ्या. सरकार जिल्हा पंचायतींना निधी देण्यासाठी तयार आहे. उगाच अधिकार नसल्याचे सांगून जबाबदारी झटकू नका. योजनांचा अभ्यास करा, त्यांचा पाठपुरावा घ्या, असेही ते म्हणाले.
गोव्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत अशी द्विस्तर पद्धत आहे. तालुका पंचायती येथे नाहीत. जिल्हा पंचायतींनी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जिपाई संस्था पंच, सरपंच, झेडपी, आमदार यांना सातत्याने प्रशिक्षण देत आहे. झेडपींनी याचा लाभ घेऊन योग्य नियोजन करावे. जिल्हा नियोजन झाले तरच राज्याचे नियोजन चांगल्या प्रकारे होईल व विकास होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एखाद्या गावात काय हवे हे गावातील लोक प्रतिनिधींना जास्त माहिती असते. केंद्राच्या अनेक योजना आहेत. पण त्याचा लाभ घेतला जात नाही. तीन कार्यकाळ झाले. आतापर्यंत किती योजना केंद्र सरकारकडे योजना पाठवल्या? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
- पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर जिल्हा पंचायतींचाही हक्क आहे, आम्ही निधी देऊ. भटक्या गुरांवर आम्ही बिगर शासयकीय संघटनांना निधी देतोच. तोच जिल्हा पंचयातींना देऊ, त्यांनी गुरांचे व्यवस्थापन करावे.
- जिल्हा पंचायत भवनासाठी जागा शोधा, सरकारी जागा दाखवा, आम्ही देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढील सहा महिन्यांत कोनशिला बसवून घ्या, जो निधी लागेल तो देईन. काम करण्याची तयारी ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करु
आराखडा तयार करण्यासाठी गेली महिनाभर आम्ही उत्तरेतील पंच, सरपंच, सेल्फ हेल्प ग्रुप, शेतकरी, शिक्षण तज्ज्ञ यांची मते मागवली आणि त्यानुसार आराखड्यात काही प्रकल्प सुचवले. २००० साली गोव्यात जि. पं. स्थापन झाल्या. त्यानंतर प्रथमच अशा प्रकारे विकास आराखडा तयार झालेला आहे. हे ऐतिहासिक काम असून आम्ही केंद्राकडूनही यापुढे विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करु. - सिध्देश नाईक, अध्यक्ष, उत्तर जिल्हा पंचायत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"