आठ लाख गमावणाऱ्या पुजाऱ्याला ग्राहक मंचाकडूनही दिलासा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 07:04 PM2020-02-05T19:04:38+5:302020-02-05T19:06:11+5:30
स्वत:च्या चुकीमुळे रक्कम गमावल्यास बँक जबाबदार नसल्याचा निवाडा
मडगाव: ऑनलाईन फसवणुकीत 8.16 लाखांची रक्कम गमावून बसलेल्या कवळे येथील एका पुजाऱ्याला ग्राहक तक्रार निवारण मंचाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. स्वत:च्या चुकीमुळे झालेल्या ऑनलाईन गैरव्यवहाराला बँकेला जबाबदार धरता येऊ शकत नाही असे नमूद करत उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा दावा फेटाळून लावला.
कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या पुजाऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र विरोधात नोव्हेंबर 2017 मध्ये हा दावा दाखल केला होता. त्यांच्या दाव्याप्रमाणे नोटबंदीच्या काळात या बँकेच्या कवळे शाखेत केलेल्या गैरव्यवहाराचा तंतोतंत तपशील देत त्यांना आपण आरबीआयचा अधिकारी अशी बतावणी करणारा फोन आला. झालेल्या व्यवहाराबद्दल सर्व माहिती देत तसेच त्यांच्या आधार कार्डाचा तंतोतंत नंबर सांगत त्या अज्ञात कॉल करणाऱ्याने त्या पुजाऱ्याचा विश्वास संपादित करत 17 फेब्रुवारी 2017 रोजी त्याच्याकडून एटीएमचा नंबर मागून घेतला. हा नंबर मागून घेताना तुमचा पीन नंबर कुणाला सांगू नका, अशी खबरदारीची सुचनाही त्यांना देण्यात आली. मात्र त्याच संध्याकाळी त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले आहेत अशा आशयाचे त्यांना मॅसेज येऊ लागले.
यामुळे भांबावलेल्या त्या पुजाऱ्याने 20 फेब्रुवारीला बँकेकडे संपर्क साधला असता तुम्ही सायबर क्राईम विभागामध्ये तक्रार द्या असे त्यांना सांगण्यात आले. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या खात्यातील 4.91 लाखांची रक्कम गोठवली गेली आहे हेही त्यांच्या लक्षात आले. यासंबंधी बँकेकडे संपर्क साधला असता सायबर विभागाच्या सुचनेवरुन ही रक्कम गोठवली गेली आहे. ती खुली करण्यासाठी आम्ही पत्र देऊ असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. मात्र बँकेने शेवटर्पयत तसे पत्र दिले नाही. या पुजाऱ्याच्या खात्यावरील रक्कम मनोजकुमार व राजेशकुमार या व्यक्तींच्या नावे वळवली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बँकेकडून आपल्याला कुठलेच सहकार्य मिळाले नाही. उलट बँकेकडे आपण केलेल्या व्यवहाराची ज्या अर्थी आपल्याला तंतोतंत माहिती देण्यात आली त्याअर्थी या घोटाळ्यात बँकेच्याच कुणा तरी अधिकाऱ्याचा हात असावा असा दावा करुन त्या पुजाऱ्याने ग्राहक मंचासमोर दावा दाखल करताना तब्बल 10 लाखाची नुकसान भरपाई आपल्याला देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र बँकेने आपल्यावरील सर्व आरोप नाकारताना सदर घटना घडल्यानंतर ग्राहकाने त्वरित बँकेशी संपर्क न साधता दोन दिवसांनंतर तो साधला याकडे लक्ष वेधले. ज्या व्यक्तींच्या नावावर ही रक्कम वळवली गेली त्या व्यक्तींशी बँकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा संबंध नव्हता. त्याशिवाय ज्या बँकांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली, त्या बँकांनाही या दाव्यात प्रतिवादी करुन घेतले नाही असा दावा करुन या घोटाळ्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला.
मंचाच्या सदस्य वर्षा बाळे यांनी 3 फेब्रुवारीला दिलेल्या निकालात स्वत:च्या चुकीने जर ऑनलाईन फसवणूक झाली तर बँकेला जबाबदार धरता येत नाही असा यापूर्वी निकाल दिला आहे. हे नमूद करत या प्रकरणात बँकेकडून दिल्या गेलेल्या सेवेत कुठल्याही प्रकारची कमतरता दिसत नाही असे नमूद करत हा दावा फेटाळून लावला.