गोव्यात पर्यटन सुरू करण्याची घाई नाही: आजगावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:38 PM2020-05-28T20:38:23+5:302020-05-28T20:39:08+5:30
गोव्याचे पर्यटन सुरू करावे अशा प्रकारची मागणी विविध घटकांकडून येते. आम्ही नुकतीच तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यांनीही पर्यटन सुरू व्हायला हवे अशा प्रकारचे मत व्यक्त केले.
पणजी : गोव्यात पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने लाखभर गोमंतकीयांच्या व परप्रांतीयांच्याही रोजगार संधींवर गदा आली आहे. मात्र देश- विदेशात कोरोनाचे संकटही मोठे असल्याने गोवा सरकारला पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची घाई नाही. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे पर्यटन खाते आहे. आजगावकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. गोव्याचे पर्यटन सुरू करावे अशा प्रकारची मागणी विविध घटकांकडून येते. आम्ही नुकतीच तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यांनीही पर्यटन सुरू व्हायला हवे अशा प्रकारचे मत व्यक्त केले.
मात्र पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची आम्हाला घाई नाही. कोरोना संकट काळात लोकांचा किंवा पर्यटकांचाही जीव धोक्यात घालून आम्हाला पर्यटन सुरू करण्याची इच्छा नाही, असे आजगावकर म्हणाले. पर्यटन व्यवसाय बंद असल्याने लाखभर लोकांची रोजगार संधी बुडाली याची सरकारला कल्पना आहे. सोशल डिस्टन्सिंगची अट पाळून रेस्टॉरंट्स वगैरे सुरू करता येतात. तोंडाला मास्क बांधणो हाही उपाय आहे. मात्र कोरोनावर औषध आल्याशिवाय व कोरोना आटोक्यात आल्याशिवाय मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू होऊ शकत नाही. गोव्यात जेव्हा पर्यटन सुरू होईल तेव्हा आम्ही प्रत्येक पर्यटकाची कोरोना चाचणी करून घेऊ. त्यानंतरच त्यास प्रवेश देऊ. अनेक पर्यटक गोव्यात येऊ पाहतात, असे उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले.
1 कोटी 60 लाख पर्यटक
दरम्यान, गोव्याला गेल्या वर्षी 1 कोटी 60 लाख पर्यटकांनी भेट दिली. जगभर पर्यटन खाते जो प्रचार करत होते, त्याचे हे फळ आहे असा दावा आजगावकर यांनी केला. केपीएमजी ह्या सल्लागार कंपनीने गोव्याच्या पर्यटनाचे सर्वेक्षण करून अहवाल दिला. 1 कोटी 60 लाख पर्यटक आल्याची माहिती त्यांनी अहवालातून दिली आहे. यापैकी 90 लाख पर्यटक हे पर्यटन खात्याशी नोंद असलेल्या हॉटेलांमध्ये राहिले. मात्र अनेक बंगले, घरे, छोटी गेस्ट हाऊस अशा ठिकाणीही बेकायदा पद्धतीने बरेच पर्यटक राहतात. यापुढे पर्यटकांना भाडय़ाने ठेवणा-या सर्व निवासस्थानांची व हॉटेलांची पर्यटन खात्याकडे नोंदणी व्हायलाच हवी अशी सक्ती सरकार करणार आहे. अन्यथा कारवाई केली जाईल. आम्ही नोंदणीसाठी संबंधितांना पुरेसा वेळ व सवलत देऊ असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.