राखीव व्याघ्रक्षेत्र नकोच; आमदार दिव्या राणे यांचा विधानसभेत विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:56 PM2023-07-28T12:56:13+5:302023-07-28T12:57:43+5:30
म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्यास पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी विधानसभेत जोरदार विरोध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्यास पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी विधानसभेत जोरदार विरोध केला.
वन खात्याच्या अनुदान मागण्यांवर चर्चेवेळी बोलताना त्या म्हणाल्या की, हे अभयारण्य १९९९ साली अधिसूचित झाले. परंतु, त्याआधी कित्येक वर्षे लोक तेथे राहत आहेत. पिढ्यान पिढ्या तिथे वाढल्या आहेत. शहरात राहून अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र जाहीर करा, असे म्हणणे सोपे आहे. ही मागणी करणाऱ्यांनी चार दिवस सत्तरी तालुक्यातील या अभयारण्यात यावे. तेथे राहावे आणि परिस्थिती पाहावी. कधीतरी दोन-तीन वर्षाने एखादा वाघ दिसला म्हणून तो भाग राखीव व्याघ्र क्षेत्र जाहीर करावा, हे स्वीकारार्ह नाही. येथे वाघ रोज दिसतात का? असा सवाल त्यांनी केला.
दिव्या राणे म्हणाल्या की, शेकडो कुटुंबे आणि हजारो लोकांचे पुनर्वसन करावे लागेल. म्हादई अभयारण्यपुरताच हा आदेश मर्यादित नसून कुळें, मोलें, नेतुर्ली ते खोतीगावपर्यंत या आदेशाचा परिणाम होईल. सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा.
दिव्या म्हणाल्या की, जे लोक हे अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र व्हावे अशा विचाराचे आहेत, त्यांनी मला आधी सर्वेक्षण दाखवून द्यावे की तेथे वाघांचे अस्तित्व आहे. जे वाघ येतात ते कर्नाटकाहून येतात आणि परत जातात. तो फक्त कॉरिडोअर आहे, असा दावा त्यांनी केला.