नॉर्मन फर्नांडीसची जन्मठेप कायम, खंडपीठाने फेटाळली आव्हान याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 03:25 PM2018-08-03T15:25:21+5:302018-08-03T15:51:27+5:30
सांताक्रूझ-पणजी येथील सासू व सुनेच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली आहे
पणजी : सांताक्रूझ-पणजी येथील सासू व सुनेच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी निवाडा राखून ठेवण्यात आला आहे. संशयित नॉर्मन फर्नाडीसला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. सांताक्रूझ-पणजी येथील भीषण दुहेरी हत्या प्रकरणात पणजी सत्र न्यायालयाने आरोपी नॉर्मन फर्नांडीस याला दिलेली जन्मठेपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने कायम ठेवताना आरोपीची आव्हान याचिका फेटाळून लावली.
2 सप्टेंबर 2012 मधील भीषण हत्याकांडात नॉर्मनने आपली सख्खी बहीण नोरीन फर्नाडीस ए वाझ व तिची सासू ऑरिटा अॅनीस ए वाझ यांचा चाकूचे वार करून हत्या केली होती. प्रॉपर्टीच्या मुद्यावरून उभयतात वाद होता आणि त्याच कारणासाठी त्याने तिची हत्या केली होती. सासूमध्ये आल्यामुळे तिलाही मारले होते. नोरीनचा पती एडगर वाजव यालाही त्याने जखमी केले होते. परंतु तो बचावला होता. दोघांचीही हत्या करून नंतर स्वतःला ही जखम करून घेतली होती व आपल्यावर हल्ला केल्यामुळे बचावासाठी त्यांना मारल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता.
या खुनाचा छडा लावताना गोवा पोलिसांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. त्वरित नॉर्मनला अटक केली होती व त्याने हत्येसाठी वापरलेला सुराही हस्तगत केला होता. पणजी सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला होता आणि न्यायालयाने नॉर्मनला दोषी ठरवून जन्मठेपीची शिक्षा ठोठावली होती. खंडपीठात आव्हान याचिका दाखल करताना आरोपीचे वकील सुरेंद्र देसाई यांनी शिक्षेत शिथिलता मागितली होती. खंडपीठात मागील बुधवारी या प्रकरणातील युक्तीवाद संपले होते व निवाडा राखून ठेवण्यात आला होता.
नॉर्मनने हत्या जाणूनबुजून केली नव्हती. रागाच्या भरात त्याच्या हातून हत्या झाल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. परंतु त्याला आक्षेप घेताना सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी रागाच्या भरात दोन ह्त्या कशा काय केल्या असा प्रश्न केला होता. तसेच हत्या करण्यासाठी लांब चाकू वगैरे घेऊन येणे, एक नव्हे तर सपासप पाच वार करणे हे सर्व पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध होत आहे असे सांगितले होते. तसेच नॉर्मनने त्या दिवशी घातलेली हाफ पॅन्ट ही लांब चाकू राहील या दृष्टीनेच घातली होती. त्यामुळे हा रागाच्या भरात झालेली हत्या नसून अत्यंत नियोजनबद्धरित्या केलेले हत्त्याकांड असल्याचे फळदेसाई यांनी न्यायालयाच्या नजरेस आणून दिले होते. बुधवारी राखून ठेवण्यात आलेला निवाडा खंडपीठाने शुक्रवारी सुनावला. त्यात ही हत्या अत्यंत निर्दयीपणे व नियोजितपणे करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरोपीची याचिका फेटळून सत्र न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले.