उत्तर गोवा जिल्हापंचायत सदस्यांच्या स्वाक्षरी मोहिमेमुळे खळबळ
By वासुदेव.पागी | Published: November 17, 2023 02:34 PM2023-11-17T14:34:49+5:302023-11-17T14:35:52+5:30
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची बैठक प्रलंबित आहे.
पणजी: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची बैठक घ्यावी यासाठी सुरू असलेली लगबग आणि सदस्यांच्या सह्यांची मोहीम यामुळे राजकारण चांगलेच रंगले आहे. जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष बदलण्यासाठीही काही सदस्य धडपडत आहेत.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची बैठक प्रलंबित आहे. ही बैठक लवकर घेण्यात यावी यासाठी जिल्हा पंचायतीचे काही सदस्य आग्रही आहेत. त्यासाठी सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांच्यासह 10 पेक्षा अधिक सदस्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केले आहेत. मात्र हे पत्र जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव आणण्यासाठी नाही तर बैठक घेण्याची मागणी करण्यासाठी आहे. जिल्हा पंचायतीची बैठक घेण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे.
दरम्यान जिल्हा पंचायतीची बैठक प्रलंबित असली तरी ही बैठक न्याय्य कारणासाठी पुढे ढकलण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो. असे असतानाही काही सदस्यांनी बैठकीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केल्यामुळे उलट सुलट तर्क केले जात आहेत. सदस्यांना केवळ बैठक हवी आहे की त्याहून अधिक काहीतरी हवे आहे अशा शंकाही निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी आणखीही सदस्य इच्छुक आहेत. परंतु जोपर्यंत विद्यमान अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक हे या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्या पदी इतर कोणालाही संधी नाही. त्यामुळेच सिद्धेश नाईक यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे ही चर्चा आहे. मात्र याविषयी विचारले असता सिद्धेश नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की जिल्हा पंचायत अध्यक्ष पदासाठी कोणती स्पर्धा नाही. अविश्वास ठरावाचा तर प्रश्नच नाही. जिल्हा पंचायतीची प्रलंबित असलेली बैठक केव्हाही घेता येईल, आणि ती घेतलीही जाईल.
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार जिल्हा पंचायती मधील घडामोडीचा भाजप राज्यस्तरीय समितीनेही दखल घेतली आहे. पंचायत सदस्यांच्या सह्यांच्या मोहिमेमुळे पक्षाने ही नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेठ तनावडे यांनी सह्यांची मोहीम हाती घेतलेल्या सदस्यांना योग्य समज दिली आहे.