मंत्रिपद सोडायला सांगितलेले नाही; बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 08:25 AM2023-11-18T08:25:07+5:302023-11-18T08:26:12+5:30
मुख्यमंत्री सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळात फेररचना केली जाईल व त्यासाठी अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेतला जाईल, अशा प्रकारची चर्चा गेले दोन दिवस आहे. मुख्यमंत्री सावंत यांना काब्राल यांनी भेटून चर्चाही केली आहे. मात्र, राजीनाम्याचा विषय आलेला नाही, असा काब्राल यांचा दावा आहे.
'लोकमत'ने काल फोनवरून काब्राल यांच्याशी संपर्क साधला. मंत्रिपद सोडण्याची सूचना आलेली आहे काय? असे काब्राल यांना विचारले असता, आपल्याला तसे कुणी सांगितलेले नाही, असे ते म्हणाले. 'मी मुख्यमंत्री सावंत यांना भेटलो हे खरे आहे; पण माझ्याकडे त्यांनी राजीनामा मागितलेला नाही,' असे काब्राल म्हणाले.
दरम्यान, काब्राल हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीलाही जाऊन आले. त्यांना भाजप श्रेष्ठींनी बोलावणे पाठवले होते. काब्राल यांचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी बोलणी झाली असल्याची माहिती मिळते. नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. त्यासाठी काब्राल यांना मंत्रिपद सोडायला सांगितले जाईल. त्यांना तसे कळविण्यात आले असल्याची माहिती मिळते. मात्र, काब्राल ही गोष्ट मान्य करत नाहीत.
मुख्यमंत्री सावंत यांच्याशीही काब्राल यांची सविस्तर चर्चा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात नुकतीच अभियंत्यांची जी भरती झाली, त्याविषयीही मुख्यमंत्र्यांशी काब्राल यांची बोलणी झाली आहेत.
राजीनामा देण्यास नकार?
दरम्यान, काब्राल हे बांधकाम मंत्री या नात्याने सक्रिय आहेत. ते चांगले काम करत आहेत, असे अन्य आमदार व मंत्री सांगतात. कुडचडे मतदारसंघातही ते जोरात विकासकामे करतात. मग अशा परफॉर्मिंग मंत्र्याला का काढले जात आहे? अशी विचारणा काही मंत्री करू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोरही पेच निर्माण झाला आहे. उद्या समजा काब्राल यांना राजीनामा देण्यास सांगितले गेले तरी, ते राजीनामा देणार नाहीत, असे काब्राल यांच्या खास
कार्यकर्त्यांच्या वर्तुळातील दोघांनी 'लोकमत'ला सांगितले.