दहा नव्हे, तांदळाच्या प्रत्येक गोणीत अळ्या! नागरीपुरवठा खात्याच्या संचालकांचा दावा ठरवला फोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 08:52 AM2023-05-12T08:52:31+5:302023-05-12T08:53:38+5:30
दुकानदार संघटनेचे सरचिटणीस गांधी हॅन्रीक यांच्याकडून भांडाफोड
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: मुरगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे असलेला सर्वच तांदूळ अळ्या झालेला असल्याचे अखिल गोवा स्वस्त रेशन धान्य दुकानदार संघटनेचे सरचिटणीस गांधी हॅन्टीक्स यांनी काल पुन्हा समोर आणले. आपण स्वतः चालवत असलेल्या दुकानात कुठ्ठाळीतील गोदामातून आणलेल्या गोण्यातील सर्वच तांदळात अळ्या झाल्याचे दाखवत नागरी पुरवठा संचालकांचे दावे खोडून काढले.
मुरगाव तालुक्यात रेशनच्या तांदळात अळ्या असल्याचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. 'लोकमत'ने दखल घेत वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली. नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी आपल्या टीमसह कुठ्ठाळी येथील गोदामाची झडती घेतली. तसेच काही दुकानांची तपासणीही केली. त्यानंतर पार्सेकर यांनी गोदामातील दहाच्या आसपास गोण्यातील तांदूळ खराब झाल्याचे सांगत व्हायरल होत असलेले फोटो, व्हिडिओ गोदामातील गोण्यांचे व तांदळाचे नसल्याचे सांगितले. त्यांचा हा दावा काल दुकानदार संघटनेचे सरचिटणीस गांधी हॅन्टीक्स यांनी फेटाळत निकृष्ठ दर्जाचा तांदूळ माध्यमांसमोर आणला.
संचालकांनी कुठ्ठाळी येथील गांधी यांनी 'लोकमत' प्रतिनिधीशी संपर्क साधून आपल्या दुकानाला भेट देण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी भरलेली गोणी फोडली असता अळ्यासह निकृष्ठ दर्जाचा तांदूळच समोर ठेवला. तसेच आत्तापर्यंत दुकानातील आपण दहा ते बारा गोण्या फोडल्या असून त्या सर्वच गोण्यातील तांदूळ निकृष्ठ दर्जाचा असल्याचे सांगितले.
यावेळी गांधी म्हणाले, मागील दोन- तीन दिवसात मला ४० ते ५० स्वस्त रेशन धान्य दुकानदारांनी संपर्क करून त्यांना नागरीपुरवठा खात्याकडून मिळालेल्या तांदळाच्या साठ्यापैंकी बहुतेक साठा निकृष्ठ दर्जाचा आणि अळ्या असलेला मिळाल्याची माहिती दिली.
माझ्या स्वस्त रेशन धान्य दुकानात आलेल्या तांदळाच्या साठ्यापैकी १० तांदळाच्या गोण्या निकृष्ठ दर्जाच्या आणि अळ्या असलेल्या आढळल्याचे सांगितले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. सर्वसामान्यांसाठी आधार ठरणारे रेशनचे धान्य आता त्यांच्या जीवावर उठले आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
आम्हाला भुर्दंड का?
गोदामातून आणलेला तांदूळ निकृष्ठ निघाला. मुरगाव तालुका निरीक्षकांसह नागरीपुरवठा खात्याच्या संचालकांनीही हा तांदूळ बदलून दिला जाईल, असे सांगितले. त्यासाठी तांदूळ परत करून चांगला तांदूळ नेण्याचे आवाहन केले. मात्र, हा तांदूळ आणण्यासाठी वाहतुकीचे पैसे दुकानदारांना सोसावे लागणार आहेत. प्रशासनाच्या चुकीचा भुर्दंड आम्ही का सोसायचा? असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला.
'लोकमत'चे आभार
रेशन कार्डधारकांना तांदळाचा साठा पुरवण्यापूर्वी गोदामातच या साठ्याची योग्य तपासणी होणे गरजेचे आहे. कुठ्ठाळी येथील गोदामात असणाऱ्या साठ्याची अधिकाऱ्यांनी तपासणी केली असती तर हा प्रकार घडलाच नसता, असे सांगून दुकानदार संघटनेचे गांधी यांच्यासह मुरगाव तालुक्यातील अनेक दुकानदारांनी या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल 'लोकमत'चे आभार मानले.
नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांनी केलेला दावा मुरगाव तालुक्यातील अनेक दुकानदारांनी त्याच्याकडे असलेला साठा उघड करून फोल ठरवला आहे. अशा प्रकारे सर्वसामान्यांना धान्य देणे ही दुर्दैवी गोष्ट असून नागरी पुरवठा मंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर दखल घ्यावी. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. - जुझे फिलीप डिसोझा, माजी मंत्री नागरीपुरवठा