"एका रात्रीत देशात नोटाबंदी लागू होते, मग खाण व्यवसाय का नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:03 PM2018-11-22T17:03:26+5:302018-11-22T17:03:56+5:30
एका रात्रीतच केंद्र सरकार नोटबंदीचा निर्णय अमलात आणू शकते तर खाण व्यवसाय बंद होऊन संकटात आलेल्या गोवेकरांच्या हितासाठी अजून योग्य पावले का उचलत नाहीत असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फीलीप डी सोझा यांनी उपस्थित केला.
वास्को: एका रात्रीतच केंद्र सरकार नोटबंदीचा निर्णय अमलात आणू शकते तर खाण व्यवसाय बंद होऊन संकटात आलेल्या गोवेकरांच्या हितासाठी अजून योग्य पावले का उचलत नाहीत असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फीलीप डी सोझा यांनी उपस्थित केला. खाण व्यवसाय बंद झाल्याने गोव्यातील शेकडो कुटूंबे आर्थिक संकटात आलेली असून खाण व्यवसाय सुरू करण्यास भाजपला जमत नसल्यास गोमंतकीयांनाही भविष्यात त्यांची गरज नसल्याचे डी’सोझा म्हणाले.
गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार ‘एमएमडीआर’ कायद्यात दुरूस्ती करून व्यवसाय पुन्हा सुरू करणार असे आश्वासन येथील सत्ताधारी भाजप पक्षातील नेते मागच्या काही महीन्यापासून देत होते. तीन दिवसापूर्वी ह्या कायद्यात दुरूस्ती होणे शक्य नसल्याचा सल्ला केंद्रीय कायदा मंत्रालयाने केंद्रीय खाण मंत्रालयाला दिल्याचे वृत्त गोव्यात पसरल्यानंतर यावरून खाण व्यवसायाशि जुळलेल्यात संतापाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून आले. खाण व्यवसाय लवकर सुरू होणार नसल्याची चिन्हे दिसून आल्याने ह्या व्यवसायाशि जुळलेल्या नागरीकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून गोव्यातील भाजप सरकारच्या विरोधातही त्यांच्या हालचाली सुरू झाल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फीलीप डी’सोझा यांची गुरुवार (दि.२२) दुपारी खाण व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटात आलेल्या विविध व्यवसायातील नागरीकांनी भेट घेऊन त्यांच्याकडून भविष्यात छेडण्यात येणार असलेल्या आंदोलनासाठी पाठींबा मागितला. ह्या बैठकीनंतर येथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना माहीती देताना ‘गोवा मायनिंग पीपल फ्रंण्ट’ च्या सदस्यांनी व खाण व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक संकटात आलेल्या विविध व्यवसायातील नागरीकांशी आपली बैठक झाल्याचे सांगितले. ११ डिसेंबरपासून लोकसभा अधिवेशन सुरू होत असून खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी एमएमडीआर कायद्यात दुरूस्ती करण्याबाबत प्रस्ताव घालण्यात आल्यास राष्ट्रीयवादी कॉग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी पाठींबा द्यावा अशी मागणी खाणग्रस्त नागरीकांनी आपल्याशी केल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते गोमंतकीयांच्या हीतासाठी खाण व्यवसाय सुरू व्हावा याकरीता पूर्ण पाठींबा देणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आलेले असून केंद्रीय नेत्यांशी याबाबत आपण चर्चा करणार अशी माहीती त्यांनी दिली.
२०१९ मध्ये संपूर्ण देशात लोकसभा अधिवेशन होणार असून ११ डीसेंबर पासून सुरू होणार असलेले लोकसभा अधिवेशन निवडणूकीपूर्वी शेवटचे असल्याचे दिसून येत असल्याचे डी’सोझा यांनी सांगितले. यानंतर आचारसहीता लागणार असून नंतर पुढची निवडणूक होऊन सरकार स्थापित होई पर्यंत काहीच होणे शक्य नसल्याचे डी’सोझा यांनी सांगून लवकरात लवकर खाण व्यवसाय सुरू करण्याची भाजपला ही सोनेरी संधी असल्याचे ते म्हणाले. जर यात भाजप अपयशी ठरत असल्यास भविष्यात गोमंतकीयांना भाजपची गरज असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी व्यक्त केली. येणाऱ्या दिवसात खाण व्यवसाय सुरू झाला नसल्यास ‘गोवा मायनिंग पीपल फ्रंण्ट’ ने दिल्लीत जंतर - मंतरवर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून तेथेही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार अशी माहीती डी’सोझा यांनी दिली.
सध्या खाण व्यवसाय बंद असल्याने गोव्यातील बार्ज, लांच, ट्रक अशा विविध व्यवसायिकदारांवर आर्थिक संकट आले असून व्यवसाय लवकरात लवकर सुरू करणार असलेल्या भाजपच्या खोट्या आश्वासनांना जनता कंटाळलेली असल्याचे साफ दिसून येत असल्याचे डी’सोझा यांनी सांगितले. गोव्यात तसेच केंद्रात भाजप सरकार असताना सुद्धा गोमंतकीयावर आलेले संकट दूर करण्यास ते का यशस्वी होत नाहीत असा सवाल डी’सोझा यांनी पुढे उपस्थित केला. मागच्या लोकसभा निवडणूकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील दोन्ही भाजप खासदार निवडून आणा बंद पडलेला खाण व्यवसाय सुरू करणार असे आश्वासन दिले होते असे डी’सोझा यांनी सांगून हे आश्वासन आता कुठे गेले असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एका रात्रीत केंद्र सरकारने नोटबंदी चा निर्णय संपूर्ण देशात अमलात आणला असून संकटात आलेल्या गोमंतकीयांच्या हीतासाठी मागच्या अनेक महीन्यापासून भाजप सरकार का यशस्वी होत नाहीत असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
मोपा विमानतळाला अनेक गोमंतकीयांचा विरोध होता तरीही सरकारने तो प्रकल्प पुढे नेला असून गोव्यातील भाजप सरकार जनतेची काळजी न करता त्यांच्या मनात असलेलेच प्रकल्प पुढे नेत असल्याचे डी’सोझा म्हणाले. कायद्यात दुरूस्ती करून लवकरात लवकर खाण व्यवसाय सुरू झाला नाही तर ह्या व्यवसायात असलेले नागरीक आंदोलन छेडणार असून त्यांना गोमंतकीयांच्या हितासाठी राष्ट्रीयवादी कॉग्रेस पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा असणार असल्याचे बैठकीत कळवण्यात आल्याची माहीती डी’सोझा यांनी शेवटी दिली. बैठकीनंतर ‘गोवा मायनिंग पीपल फ्रंण्ट’ चे अध्यक्ष तथा कामगार नेते पुतू गावकर यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता खाण व्यवसाय सुरू होत नसल्याने डीसेंबर ११ ते १३ असे तीन दिवस आमची संघटना जंतर - मंतरवर धरणा कार्यक्रम करणार असून यासाठी आम्ही डी’सोझा यांना भेटून पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचा पाठिंबा मागितलेला असल्याचे सांगितले.
डी’सोझा यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे गावकर यांनी सांगून धरण्याच्या दिवशी शरद पवार अथवा प्रफुल पटेल ह्या नेत्यांना दिल्लीत धरण्याच्या वेळी संबोधीत करण्यासाठी आणणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे गावकर यांनी पुढे सांगितले. खाण व्यवसाय बंद झाल्याने शेकडो लोक आर्थिक संकटात आलेले असून लवकरच हा व्यवसाय सुरू न करत आमच्या पोटावर कोणी पाय ठेवल्यास पुढच्या लोकसभा निवडणुकीत त्याचे पाय मोडणार असल्याचे गावकर यांनी शेवटी बोलताना सांगितले.