आधी साधनसुविधा उभारा नंतर अवयव मिळतील, नोटोची गोव्याला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 02:53 PM2018-04-13T14:53:23+5:302018-04-13T14:53:23+5:30
गोव्यात जोपर्यंत क्रॉस मॅचिंगची सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत गोव्यात ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव देणे शक्य होणार नाही, असे राष्ट्रीय अवयव व पेशी रोपण संस्थेने (नोटो) स्पष्ट केले आहे.
पणजी : गोव्यात जोपर्यंत क्रॉस मॅचिंगची सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत गोव्यात ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव देणे शक्य होणार नाही, असे राष्ट्रीय अवयव व पेशी रोपण संस्थेने (नोटो) स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नोटोकडून गोवा सरकारला पाठविलेल्या पत्रात गोव्यात अवयव क्रॉस मेचिंग व्यवस्था आणि अवयव रोपणाची गरज असलेल्या रुग्णांची प्रलंबित यादी बनवण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.
दाते असले तरी झोळी दुबळी असा प्रकार सध्या गोव्याच्या बाबतीत झालेला आहे. ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव काढले जातात आणि ते गोव्याबाहेर पाठविले जातात ते आपली आरोग्य यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्यामुळे आणि अपु-या साधन सुविधांमुळेच हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अवयव प्रकरणात सध्या जी काही चौकशी सुरू करण्यात आल्या आहेत आणि आदळ आपट होत आहे ती केवळ आपल्या दुबळ्या बाजूंवर पांघरूण घालण्यासाठीच असल्याचेही लपून राहिले नाही.
अवयवदान वादाच्या पार्श्वभूमीवर नोटोचे संचालक डॉ विमल भंडारी यांनी गोव्याचे आरोग्य संचालक अशोक कुमार यांना पत्र लिहिले आहे. त्यात गोव्यात अवयव रोपणासंबंधी आवश्यक असलेल्या गोष्टी करण्यास सांगितले आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या रुग्णांवर अवयव रोपण करण्याची गरज आहे. त्या रुग्णांची यादी तयार असली पाहिजे. दुसरी गोष्ट गोमेकॉची प्रयोगशाळा अद्यवत करून त्यात साधन सुविधा वाढविल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे अवयवांचे क्रॉस मॅचिंग चाचणी करण्याची सुविधा दिली पाहिजे. तिसरी गोष्ट राज्य अवयव व पेशी रोपण संस्था (सोटो) अधिकृतरित्या बनविली पाहिजे. या तीन गोष्टी अवयव रोपणासाठी अनिवार्य असल्याचे नोटोकडून सांगण्यात आले आहे. याविषयी दैनिक लोकमतशी बोलताना डॉ भंडारी म्हणाले, 'अवयवदानाच्या बाबतीत गोव्यात चांगली जागृती होते आहे ही चांगली गोष्ट आहे.
गोव्यात दान करण्यात आलेले अवयव हे गोव्यातील रुग्णांना प्राधान्य क्रमाने दिलेच पाहिजेत, परंतु त्यासाठी जी व्यवस्था गोव्यात असायला हवी आहे ती लवकर उभारण्यात यावी. अवयवांचे क्रॉस मॅचिंग आवश्यक तर आहेच, परंतु ते लवकर झाले पाहिजे. इतर राज्यातील प्रयोगशाळेत पाठवून चाचणी करून घेऊन अहवाल मिळवण्यापर्यंतचा वेळ वाया जाऊ देणे घातक आहे. अशाने अवयव खराब होण्याची शक्यता असते', गोवा प्रयोगशाळा अद्ययावत करण्याविषयी आणि क्रॉस मॅचिंग सुविधेसंबंधी आपण गोवा सरकारला लिहिल्याचेही त्यांनी सांगितले.