हरित लवादाची सरकारला नोटीस बायणा किनारा सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 04:06 PM2016-10-27T16:06:38+5:302016-10-27T16:06:38+5:30
बायणा समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने गोवा पर्यटन विकास महामंडळाला नोटीस जारी करण्यात आली आहे
पणजी: बायणा समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने गोवा पर्यटन विकास महामंडळाला नोटीस जारी करण्यात आली आहे.या बांधकामाला हरकत घेणारी याचिका गोवा फाऊन्डेशनतर्फे राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती.
किनारा नियमन निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा दावा करून राष्ट्रीय हरित लवादापुढे दाखल केलेल्या दाव्यात गोवा फाऊंन्डेशनने बायणा किनाऱ्यावर सुरू असलेली बांधकामे त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. सरकारच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अनिर्बंध बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या बांधकामामुळे या किनाऱ्याची कायम स्वरुपी हानी होणार आहे. या किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आहेत. नैसर्गीक संपदेची देणगी असलेल्या या किनाऱ्याचे कॉंक्रिटीकरण करण्यास जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच जे बांधकाम आतापर्यंत करण्यात आले आहे तेही नष्ट करून किनाऱ्याला मूळ नैसर्गीक स्वरूप प्राप्त करून द्यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
गोवा फाऊंडेशनतर्फे या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा आदेश देण्यात आला होता, परंतु ती मागणी मंजूर करण्यात आली नाही. या प्रकरणात पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेली या प्रकल्पाला अंतरीम स्थगिती देण्याच्या संदर्भात आदेशाची अपेक्षा आहे.