हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान प्रकरणी हायकोर्टाची पोलिसांना नोटिस
By admin | Published: July 1, 2016 09:16 PM2016-07-01T21:16:50+5:302016-07-01T21:16:50+5:30
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर गोव्यात १.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुझान हिने येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात
- १.८७ कोटी रुपये फसवणुकीचे प्रकरण
पणजी : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर गोव्यात १.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुझान हिने येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्यास आव्हान दिल्याने कोर्टाने पोलिसांना नोटिस बजावून दोन आठवड्यांच्या आत उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.
स्वत: डिझायनर अससेल्या सुझानने आपण वास्तुविशारद असल्याचे सांगून कंत्राट मिळविल्याचे पणजी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले होते. २0 जून रोजी या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता. एम्गी प्रोप्रायटर या खासगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुधित गुप्ता यांनी तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी सुझान हिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांनी समन्सही बजावले होते.
सुझानने स्वत: वास्तुविशारद असल्याचे भासवून कंपनीच्या एका कंत्राटासाठी अर्ज केला व ते मिळविले. उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात शिरदोण येथे कंपनीचा नायरा कॉम्प्रेक्स उभारण्याचे हे कंत्राट होते. त्यासाठी तिला १.८७ कोटी रुपये कंपनीकडून दिले होते. प्रत्यक्षात तिच्याकडून झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे ती व्यावसायिक वास्तुविशारद नसल्याचा कंपनीला संशय आला. कंपनीने तिच्याकडे काउन्सिल आॅफ आर्किटेक्चरकडून तिला मिळालेला नोंदणी क्रमांक विचारला तेव्हा तिने तो देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीचा संशय बळावल्यामुळे पोलिसांत तक्रार नोंदविली.