सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी ईडीची हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:13 PM2020-08-28T18:13:49+5:302020-08-28T18:20:56+5:30
सोमवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले.
पणजी: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी मनी लाँडरिंगच्या दिशेने तपास करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाने गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याला ३१ रोजी चौकशीकरिता उपस्थित राहण्यासाठी नोटिस बजावली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराच्या दारावर ही नोटिस चिकटविली आहे. या प्रकरणात रिया हिला डिलिट केलेल्या वॉटसअप मॅसेजीसबद्दल अधिकाऱ्यांनी विचारणा करुन काही मॅसेजीस प्राप्त केल्याची माहिती मिळते. अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी हे मॅसेजिस असल्याचा कयास आहे.
गौरव आर्या याच्या मालकीच्या हणजुण येथील ‘हॉटेल टॅमेरिंड’ला ईडीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता ते बंद आढळले. त्यामुळे हॉटेलच्या दरवाजावर नोटिस चिकटविण्यात आली. आर्या याला ३१ रोजी मुंबईत सकाळी ११ वाजता ईडीचे साहाय्यक संचालक राजीव कुमार यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजावले आहे. आर्या याच्या मालकीचे ‘कॅफे कोटिंगा’ हे अन्य एक आस्थापनही गोव्यात आहे. मात्र हॉटेल आणि हे आस्थापन लॉकडाउनपासून बंदच आहेत.
दरम्यान, गोव्यात रिसॉर्ट असलेला हॉटेल उद्योजक गौरव आर्या या प्रकरणात एनसीबीच्याही रडारखाली आहे. अलीकडेच वागातोर येथे झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे गूढही याच प्रकरणाशी जोडले जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रणचे क्षेत्रीय विभागाचे पथकही गोव्यात आहे. दिल्लीहून या तपासकामाची सूत्रे हलविली जात आहेत. संशयित रिया चक्रवर्ती व गौरव आर्या यांच्यातील कथित वॉटसअप चॅट हाती लागल्याचा दावा तपास एजन्सीने केला आहे. त्यामुळे आर्या याची चौकशी या प्रकरणात आवश्यक बनली आहे. १६ ऑगस्ट रोजी गोव्यात हणजुण येथे रेव्ह पार्टी झाली होती. गोवा क्राईम ब्रँचने कारवाई करुन ती बंद पाडली होती. या पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाला होता.