बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गोव्याच्या वीजमंत्र्यासह मुख्य सचिव, एसीबी अधीक्षकांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:33 PM2018-08-17T13:33:39+5:302018-08-17T13:37:31+5:30
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गोव्याच्या वीजमंत्र्यासह मुख्य सचिव, एसीबी अधीक्षकांना नोटिसा बजावल्या असून या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी १0 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
पणजी : गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्त पि. के. मिश्रा यांनी मडकईकर यांच्यासह मुख्य सचिव तसेच लाचलुचपत विरोधी विभागाच्या पोलीस अधीक्षकांना नोटिसा बजावल्या असून या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी १0 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
आयरिश रॉड्रिग्स यांनी सादर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरील तिघांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणात लाचलुचपत विरोधी विभागाला फाईल्स परत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आयरिश यांनी या प्रकरणात दक्षता खात्याच्या लाचलुचपतविरोधी विभागाकडे तक्रार केली होती. परंतु या विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली. मडकईकर यांनी बॉ जिझस बासिलिका चर्चजवळ सुमारे २00 कोटी रुपये बांधलेल्या आलिशान बंगल्याच्या हवाला देऊन आयरिश यांनी मंत्री मडकईकर व त्यांची पत्नी जेनिता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तक्रार केली होती.
जेनिता या जुने गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. या उभयतांविरुद्ध १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२0 (ब) खाली गुन्हे नोंद करून लाचलुचपत विभागाला या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आयरिश यांनी केली होती. आयरिश यांनी आपल्या तक्रारीत मडकईकर यांच्या २00 कोटींच्या या आलिशान बंगल्याचे फोटोही जोडले होते. २0१५-१६ च्या आयकर विवरणपत्रात मंत्री मडकईकर यांनी स्वत:चे वार्षिक उत्पन्न १,४४,३८९ रुपये एवढे अल्प उत्पन्न दाखवले आहे. असे असताना २00 कोटींचा आलिशान बंगला बांधला कसा, असा प्रश्न आयरिश यांनी उपस्थित केला आहे. जुने गोवेतील सर्वे क्रमांक १४३/१ या जागेत ५८० चौरस मीटरमध्ये हा अलिशान बंगला बांधण्यात आला आहे. मंत्री मडकईकर हे सध्या आजारी असून मुंबईतील एका खासगी रूग्णालयात गेले काही दिवस वैद्यकीय उपचार घेत आहेत. येत्या सोमवारी ते गोव्यात परतण्याची शक्यता आहे.