सावंतवाडी येथे भरती मेळावे घेतलेल्या २२ कंपन्यांना गोवा सरकारच्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 12:25 PM2018-04-17T12:25:04+5:302018-04-17T12:25:04+5:30
सावंतवाडीत भरती मेळावे घेतलेल्या गोव्याच्या २२ कंपन्यांना सरकारने कारवाई का करु नये, अशी विचारणा करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. यापुढे खाजगी कंपन्यांमध्ये जागा रिक्त झाल्यास त्याची माहिती आधी रोजगार विनिमय केंद्राला देणे सक्तीचे केले जाईल.
पणजी : सावंतवाडीत भरती मेळावे घेतलेल्या गोव्याच्या २२ कंपन्यांना सरकारने कारवाई का करु नये, अशी विचारणा करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. यापुढे खाजगी कंपन्यांमध्ये जागा रिक्त झाल्यास त्याची माहिती आधी रोजगार विनिमय केंद्राला देणे सक्तीचे केले जाईल. त्यासाठी लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे. नजीकच्या काळात बेकारांना सरकारच्या मदतीने खाजगी कंपन्यांमध्ये रोजगार देण्याची योजनाही विचाराधीन आहे. तसेच खाणपट्ट्यात तीन ते चार भरती मेळावे घेतले जाणार आहेत.
मजूरमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अलीकडेच काही बड्या कंपन्या ज्यांचे कारखाने गोव्यात आहेत त्यांनी सावंतवाडी येथे भरती मेळावे घेऊन तेथील लोकांना गोव्यातील कारखान्यांमध्ये नोकऱ्या दिल्या. या गोष्टीला जोरदार विरोध झाला होता. खात्याने याची गंभीर दखल घेऊन या कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. खंवटे म्हणाले की, ‘या कंपन्यांनी रोजगार विनिमय कायद्यानुसार रिक्त जागा आधी येथे अधिसूचित करायला हव्या होत्या त्या केल्या नाहीत. नोटिसांना उत्तर देण्यासाठी या कंपन्यांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सर्व गोष्टी स्पष्ट करणारी अधिसूचनाही लवकरच काढली जाणार आहे. खाजगी क्षेत्रात बेकारांना नोकºया उपलब्ध करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, भारतीय उद्योग महासंघ आदी संस्थांकडेही चर्चा करण्यात आली आहे.’
१ लाख २१ हजार बेकारांची नोंदणी
- खाणपट्टयात मजूर खाते घेणार भरती मेळावे २0१६ पासून चार ते पाच भरती मेळावे मजूर खात्याने घेतले त्यात एकूण ११,३८३ जणांनी भाग घेतला. ४२३३ रिक्त जागा होत्या पैकी ८५४ जणांना नोकऱ्या मिळाल्या. रोजगार विनिमय केंद्रात सध्या १ लाख २१ हजार बेकारांची रोजगारासाठी नोंदणी आहे. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम केलेल्यांनी नोंदणी केलेली असून काहींनी दोनवेळा नोंदणी केलेली आहे. खाणबंदीमुळे त्या भागात बेकारी निर्माण झालेली आहे त्यामुळे नजीकच्या काळात तीन ते चार भरती मेळावे खाणपट्ट्यात घेतले जातील. बार्देस तालुक्यातही एक मेळावा होईल.
राज्यात लघु, मध्यम व मोठे मिळून ११0६ उद्योग आहेत. सर्व कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागप्रमुखांना बोलावून आवश्यक ते निर्देश दिले जातील. खाजगी क्षेत्रात बेकारांना नोकऱ्या उपलब्ध करताना ईएसआयसारखा भार सरकार उचलू शकते, असे संकेत खंवटे यांनी दिले. येत्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात यासंबंधी घोषणा करु, असे त्यांनी सांगितले.
मोपा येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळाच्या पार्श्वभूमीवर तेथे मोठ्या प्रमाणात नोकºया निर्माण होणार आहे. हवाई क्षेत्रासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासही खात्याने पुढाकार घेतलेला आहे. जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला प्रशिक्षण केंद्र उघडण्यास सांगितले आहे. पेडणे आयटीआयचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे.
दरम्यान, मजूर खात्याने ११ सेवा ऑनलाइन केल्या असून त्याचे उद्घाटन मंत्री खंवटे यांच्या हस्ते झाले. दुकान किंवा आस्थापनांची नोंदणी, परवाना नूतनीकरण, कंत्राटदारांना परवाने, परवान्यांचे नूतनीकरण आदी गोष्टी आता घरबसल्या करता येतील. व्यापाºयांना मजूर खात्यात खेपा माराव्या लागणार नाहीत. मे २0१७ पासून महसूल खात्याने एकूण ३२ सेवा आॅनलाइन केल्याची माहितीही खंवटे यांनी दिली.
पत्रकार परिषदेस मजूर खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी व इतर अधिकारी उपस्थित होते.