५५ कोटींच्या वसुलीसाठी खाण कंपन्यांना नोटिसा
By admin | Published: February 19, 2015 02:22 AM2015-02-19T02:22:37+5:302015-02-19T02:24:41+5:30
पणजी : राज्यातील खनिज लिजधारकांकडे यापूर्वी थकलेला वाहतूक अधिभार (सेस) वसूल करण्यासाठी वाहतूक खात्याने लिजधारक असलेल्या खाण
पणजी : राज्यातील खनिज लिजधारकांकडे यापूर्वी थकलेला वाहतूक अधिभार (सेस) वसूल करण्यासाठी वाहतूक खात्याने लिजधारक असलेल्या खाण कंपन्यांना नोटिसा पाठविण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. बुधवारी आणखी दहा खनिज लिजधारकांना खात्याने नोटिसा पाठवून त्वरित एकूण ५५ कोटी रुपयांचा वाहतूक अधिभार भरण्याची सूचना केली आहे.
यापूर्वी वाहतूक खात्याने सुमारे १५० कोटी रुपयांचा अधिभार वसूल केला आहे. २००६ सालापासून हा वाहतूक अधिभार थकला होता. यापूर्वी काही खाण कंपन्यांनी वाहतूक अधिभार भरण्यास नकार दिला होता. त्यांचा अशा प्रकारच्या अधिभारास आक्षेप होता व त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. तथापि, विद्यमान सरकारने अलीकडे ८४ खाण लिजांचे नूतनीकरण करून दिल्याने व त्यापैकी ४३ लिजांबाबत करारावरही सह्या केल्याने खाण कंपन्या वाहतूक अधिभार भरण्यास तयार झाल्या.
आता आणखी दहा खनिज लिजधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यात सेसा मायनिंग, सेसा रिसोर्सिस आदी काही कंपन्यांच्या लिजांचा समावेश आहे. हे ५५ कोटी रुपये आल्यानंतर २00 कोटींपेक्षा जास्त महसूल वसूल झाल्यात जमा होणार आहे. खाण खात्याने सध्या लिज करारांवर सही करणे स्थगित ठेवले आहे. ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाहतूक खात्याला आणखी अधिभार प्राप्त होऊ शकतो.
(खास प्रतिनिधी)