गोवा डेअरीच्या १८ संचालकांना नोटिसा; कथित घोटाळा प्रकरणी सहकार निबंधकांचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:34 PM2023-02-12T12:34:17+5:302023-02-12T12:35:46+5:30
संचालक मंडळावर असलेल्या १८ व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहकारी संस्थांच्या निबंधकांनी पुन्हा एकदा गोवा डेअरीच्या कथित घोटाळा प्रकरणात १७ फेब्रुवारी रोजी सहकारी संस्था निबंधक, पाटो-पणजी येथील कार्यालयात सुनावणी होणार आहे. संचालक मंडळावर असलेल्या १८ व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सदोष निर्णयामुळे गोवा डेअरीला ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यास सहकारी संस्थांचे निबंधक दिरंगाई करत असल्याचा दावा करत तक्रारदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सहकारी संस्थांच्या निबंधकांना तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौकशीची चक्रे पुन्हा फिरू लागली आहेत.
सहाय्यक निबंधकांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार पशुखाद्य निर्मिती केंद्रात दर्जाहीन साहित्य वापरण्यात आल्याचे, म्हशीचे दूध शेजारील राज्यातून अधिक दराने खरेदी करण्यात आले, आईस्क्रीम प्लांटसाठी कमी दर्जाचे मशिन खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले. यामुले गोवा डेअरीला १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"