गोवा: ‘कदंब’ची पास योजना अधिसूचित ; नियमित प्रवासी, विद्यार्थ्यांना विशेष सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 08:34 PM2017-12-07T20:34:39+5:302017-12-07T20:37:10+5:30

गोव्यात प्रवाशांची सार्वजनिक वाहतूक करणा-या कदंब महामंडळाने नियमित प्रवाशांसाठी अखेर पास योजना अधिसूचित केली असून येत्या १ जानेवारीपासून ती लागू होणार आहे.

Notified scheme of 'Kadamb'; Regular traveler, special discount for students | गोवा: ‘कदंब’ची पास योजना अधिसूचित ; नियमित प्रवासी, विद्यार्थ्यांना विशेष सवलत

गोवा: ‘कदंब’ची पास योजना अधिसूचित ; नियमित प्रवासी, विद्यार्थ्यांना विशेष सवलत

googlenewsNext

पणजी : गोव्यात प्रवाशांची सार्वजनिक वाहतूक करणा-या कदंब महामंडळाने नियमित प्रवाशांसाठी अखेर पास योजना अधिसूचित केली असून येत्या १ जानेवारीपासून ती लागू होणार आहे. रोज प्रवास करणा-यांना तिकीट भाड्यात पासद्वारे ४0 ते ६0 टक्के सवलत मिळणार आहे. तर शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये रोज ये-जा करणा-या विद्यार्थ्यांना ७0 ते ८0 टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेसाठी वर्षाकाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये सरकार कदंब महामंडळाला देणार आहे. 

आठवड्याचा पास घेतल्यास ४0 टक्के, पंधरवड्याचा पास घेतल्यास ५0 टक्के तर मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पास घेतल्यास ६0 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल. विद्यार्थ्यांना एरव्ही बसमध्ये ५0 टक्के सवलत दिली जाते. तथापि त्यांनी आठवडाभराचा पास काढल्यास ७0 टक्के, पंधरवड्याचा पास काढल्यास ७५ टक्के तर मासिक, तिमाही, सहामाही व वार्षिक पास काढल्यास ८0 टक्के सवलत देण्यात येईल. कदंबच्या बसगाड्या ज्या मार्गांवर धावतात तेथेच पास वापरता येतील. 

नेहमीच्या प्रवाशांबरोबरच पर्यटकांनाही पास हवे असल्यास ते दिले जातील. पासधारकांना प्रवासाच्यावेळी तिकीट दिले जाईल. परंतु त्यावर कोणतीही रक्कम असणार नाही. या सवलतीतून होणा-या नुकसान भरपाईबाबत दर तीन महिन्यांनी कदंब महामंडळाने सरकारकडे दावा करता येईल. 

सरकारने पास योजनेचे नूतनीकरण न केल्याने गेल्या महिन्यात काही काळ ‘कदंब’ने पास वितरित करणे बंद केले होते. खास करुन विद्यार्थ्यांची त्यामुळे बरीच परवड झाली होती. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिध्द करताच तीन दिवसातच पुर्ववत् वितरण सुरु झाले. आता त्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात आली आहे. शटल सेवेबरोबरच कदंब महामंडळाच्या इतर बसगाड्यांवरही टर्म पासेस्चा वापर विद्यार्थी करत असतात. त्यामुळे त्यांना तिकीट भाडे बरेच कमी पडते. राज्यातील हजारो विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी कदंब महामंडळाचे सवलतीच्या तिकीट भाड्याचे सहा महिन्यांसाठीचे टर्म पासेस् घेत असतात.

मडगांव, वास्कोहून नोकरीसाठी रोज पणजीत येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात पास योजनेचा लाभ घेतात. पणजी-मडगांव, पणजी-वास्को, मडगांव-वास्को, मडगांव-सावर्डे, म्हापसा-पणजी, साखळी-पणजी, पणजी-फोंडा आदी सात मार्गांवर शटलसेवा आहे. या व्यतिरिक्त अन्य मार्गांवरही कदंबच्या नियमित बसगाड्यांमध्ये प्रवासी पास सवलत घेऊन प्रवास करीत असतात. 

Web Title: Notified scheme of 'Kadamb'; Regular traveler, special discount for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा