नोव्हेंबरही फेल... गोव्याच्या दाबोळी विमानतळावर विदेशी चार्टर्ड विमाने येणारच नाहीत
By महेश गलांडे | Published: November 1, 2020 08:12 PM2020-11-01T20:12:12+5:302020-11-01T20:12:39+5:30
लॉकडाऊननंतर भारत सरकारने अजून विदेशी प्रवासी विमानसेवा हाताळण्यास सुरू केली नसल्याने गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू होऊन सुद्धा अजून एकही चार्टर विमान दाबोळीवर उतरलेले नाही.
वास्को: ऑक्टोंबर महिन्यात गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू झाला असला तरी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विदेशी पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर चार्टर विमाने येणार नसल्याचे एकंदरीत निश्चित झाल्याने याचा गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला आर्थिकरित्या मारा बसणार आहे. मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये विविध राष्ट्रातून शेकडो विदेशी पर्यटकांना घेऊन सुमारे १७५ चार्टर विमाने यायची, मात्र नोव्हेंबर अखेरपर्यंत भारतात विदेशी विमानसेवा सुरू न करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याने यंदा नोव्हेंरबमध्ये गोव्यात विदेशातून पर्यटकांची येण्याची शक्यता शून्य झाली आहे. दाबोळी विमानतळ चार्टर विमाने हाताळण्यास पूर्णपणे सज्ज असून केंद्र सरकार देशात कधीपासून विदेशी विमाने हाताळण्यास सुरू करणार याच्या प्रतिक्षेत असल्याचे दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी सांगितले.
लॉकडाऊननंतर भारत सरकारने अजून विदेशी प्रवासी विमानसेवा हाताळण्यास सुरू केली नसल्याने गोव्यातील पर्यटक हंगामा सुरू होऊन सुद्धा अजून एकही चार्टर विमान दाबोळीवर उतरलेले नाही. मागील वर्षात ऑक्टोंबरमध्ये सुमारे ४० विदेशी चार्टर विमाने पर्यटकांना घेऊन गोव्यात यायची, मात्र यावर्षी ती आली नसल्याने पर्यटक क्षेत्राला याची यंदा आर्थिक नुकसानी सोसावी लागली. दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांच्याशी संपर्क केला असता केंद्र सरकारच्या नुकत्याच आदेशानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत भारतात विदेशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार नाही. यामुळे गोव्यात यामहीन्यात विदेशी चार्टर विमाने येण्याची शक्यता शून्य झाल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये १७५ च्या आसपास विदेशी चार्टर विमाने दाबोळी विमानतळावर उतरायची असे मलिक यांनी सांगितले. गोव्यात केव्हापासून विदेशीचार्टर पर्यटकांना घेऊन उतरणार असे त्यांना विचारले असता केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय घेतल्यानंतरच याप्रश्नाचे उत्तर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चार्टर विमाने सुरू झाली नसल्याने गोव्यातील पर्यटक व्यवसायाला नुकसानी
नोव्हेंबरमध्ये सुद्धा दाबोळीवर चार्टर विमाने उतरणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ऑक्टोंबर व नोव्हेंबर अशा दोन महीन्याच्या पर्यटकहंगामा काळात येणारी सुमारे २१५ चार्टर उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटक व्यवसायाला आर्थिक फटका बसणार असल्याची माहीती काहींनी चर्चे वेळी दिली. पर्यटक हंगामाच्या काळात चार्टर विमानातून मोस्को, कजाकिस्तान, युके, युक्रेन इत्यादी विविध राष्ट्रातून पर्यटक गोव्यात येत असून यंदा ते केव्हापासून येणार हे केंद्र सरकारने देशात विदेशी विमाने हाताळण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतरच स्पष्ट होणार.