जुने गोवे येथील नोव्हेना उद्यापासून, स्टॉल्स लावण्यास सुरुवात
By पूजा प्रभूगावकर | Published: November 23, 2023 02:49 PM2023-11-23T14:49:00+5:302023-11-23T14:50:29+5:30
नोव्हेनांसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. यात केवळ गोव्यातील नव्हे तर कर्नाटक, महाराष्ट्राच्या भाविकांचा सुद्धा समावेश असतो.
पणजी: जुने गोवे येथील गोंयच्या सायबाच्या फेस्ता निमित्त उद्या शुक्रवारपासून नोव्हेनांना सुरुवात होईल. त्यानुसार फेस्ताच्या फेरी निमित्त स्टॉल्स घालण्यास सुरुवात झाली आहे.
नोव्हेनांसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. यात केवळ गोव्यातील नव्हे तर कर्नाटक, महाराष्ट्राच्या भाविकांचा सुद्धा समावेश असतो. त्यामुळे फेस्तापूर्वीच या ठिकाणी भाविकांची रेलचेल सुरु असते. विशेष करुन संध्याकाळच्या फेस्तानिमित्त भरणाऱ्या फेरीत खरेदीसाठी भाविक तसेच लोक मोठी गर्दी करतात. यंदा गोंयच्या सायबाचे फेस्त हे ३ डिसेंबर एवजी सोमवार ४ डिसेंबर रोजी होणार आहे.
रविवारी फेस्ताचे आयोजन होत नसल्याने ते एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. फेस्तानिमित्त सध्या बासिलिका ऑफ बॉम जिजस या चर्च परिसरातील वीज खांबांची सफाई तसेच रंगरंगोटीचे काम, विद्युतीकरण केले जात आहे. या शिवाय सुरक्षेच्या कारणावस्त वॉच टॉवर उभारला जात आहे. त्यावर उभे राहून गोवा पोलिस कर्मचारी हे आजूबाजूच्या परिसरावर देखरेख ठेवतात.तसेच वाहतूक व्यवस्थेतही बदल केला आहे.