गोमेकॉत आता ६ महिन्यात यकृतरोपण शस्त्रक्रियाही
By वासुदेव.पागी | Published: April 18, 2023 08:00 PM2023-04-18T20:00:17+5:302023-04-18T20:02:21+5:30
सुपर स्पेशलिटी सेवेत आणखी एक सुविधा जोडताना ६ महिन्यात यकृत रोपण शस्त्रक्रियाही सुरू केल्या जातील.
पणजी - गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची सुपर स्पेशलिटी सुविधा हा गोमंतकियांना आणि गोव्याबाहेरील लोकांनाही फार मोठा दिलासा आहे. सुपर स्पेशलिटी सेवेत आणखी एक सुविधा जोडताना ६ महिन्यात यकृत रोपण शस्त्रक्रियाही सुरू केल्या जातील.
मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया गोमेकॉत केल्या जातात. युरोलोजी विभागाचे प्रमुख डॉ मधुमोहन प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मूत्रपिंड रोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. आता गोमेकॉचा गँस्ट्रो विभागही अशीच सुविधा देताना यकृत रोपण शस्त्रक्रियाही करणार आहे. गोमेकॉचे डीन डॉ शिवानंद बांदेकर यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.
यासाठी गोमेकॉत गँस्ट्रो विभाग स्थापन करण्यात आला आहे. डॉ अमित मायदेव या तज्ज्ञ डॉक्टरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. राहिलेली कामे मार्गी लागेपर्यंत आणखी तीन चार महिने जातील. परंतु कोणत्याही परिस्थितीत येत्या सहा महिन्यात यकृताच्या शस्त्रक्रिया गोमेकॉत सुरू केल्या जातील असेही डॉ बांदेकर यांनी सांगितले.
यकृतरोपण -
एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये अपरिवर्तनीय बदल झाल्यास किंवा अतिमद्यपानामुळे यकृत खराब झाल्यास तज्ज्ञ डॉक्टर यकृत रोपणाचा सल्ला देतात. यात, निरोगी व्यक्तीच्या यकृताचा लहानसा भाग काढून त्याचे रोपण रुग्णाच्या यकृतात करतात. काही काळाने रुग्णाच्या यकृताची वाढ होऊन ते पूर्वीप्रमाणे कार्य करू लागते.