आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष; टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाबाबत आज तोडगा अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 11:14 AM2024-08-26T11:14:17+5:302024-08-26T11:15:25+5:30
समस्या सोडविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी व्यावसायिकांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू ठेवलेल्या आंदोलनात सहा मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता सरकारने करावी यासाठी शेकडो व्यावसायिक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. आज, सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कोणती भूमिका घेतात, व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच.
गेल्या दोन-तीन दिवसांतील जोरदार पावसाची पर्वा न करता शेकडो टॅक्सी व्यावसायिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. रस्त्यावरच जेवण, नाष्टा करत हे अधिक रात्रीही तेथेच मुक्कामाला आहेत. एका बाजूने टॅक्सी व्यावसायिकांना व्यवस्थित व्यवसाय मिळत नाही. काही व्यावसायिकांनी बँकांची कर्जे घेऊन वाहने घेतली आहेत, त्यांचे हप्ते वेळेवर भरताही येत नसल्याची स्थिती आहे. आम्हाला सरकारी नोकरी मिळावी यासाठी आंदोलन करत नाही, तर व्यवसाय प्रामाणिकपणे करायचा त्याच्याशी संबंधित मागण्या पूर्ण करा, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
शेकडो व्यावसायिक आपल्या मागणीसाठी आंदोलन करीत असतील तर मुख्यमंत्री येथे का भेट देत नाहीत? असाही प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनस्थळी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोल, उत्तर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष दीपक कलंगुटकर, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, तारा केरकर, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, टॅक्सी संघटनेचे भास्कर नारुलकर, मांद्रेचे माजी सरपंच अॅड. अमित सावंत यांच्यासह राज्यातील टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली आहे.
व्यावसायिकांचे प्रश्न ऐकून घेतले आहे. आमदार आर्लेकर, जीत आरोलकर यांनी सरकारच्या बाजूने भूमिका मांडत व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, गेल्या चार दिवसात त्यांना यश आलेले नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. निर्णय समाधानकारक झाला, तर आज, पाचव्या दिवशी आंदोलनाला पूर्णविराम मिळू शकतो.
या आहेत मागण्या...
लिंक रोडवरील टोल हटवावा, गोवा माइल्सचा काउंटर हटवावा, टॅक्सी काउंटर फी कमी करावी यांसह मोपावर टॅक्सींसाठी २०० रुपये केलेली पार्किंग फी आणि टॅक्सी थांबण्यासाठी असलेली ५ मिनिटांची वेळ वाढवावा, अशा मागण्या व्यावसायिकांनी केल्या होत्या. यापैकी सरकारने टॅक्सीचे पार्किंग शुल्क २०० रुपयां- वरून पूर्ववत ८० रुपये केले आहे. तर तर पार्किंगसाठीचा पा वेळ ५ मिनिटांऐवजी १० मिनिटे केला आहे. मात्र, गोवा माइल्स हटवावा, लिंक रोडवरील टोल अशा मागण्या व्यावसायिकांनी ताणून धरल्या आहेत.