गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासळी तपासण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय एजन्सी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:05 PM2018-10-22T18:05:39+5:302018-10-22T18:05:53+5:30
गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासळी तपासण्यासाठी आता एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी ही जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय संस्था कौन्सिल आॅफ इंडिया या केंद्रीय संस्थेच्या सहयोगाने काम करणार आहे.
पणजी : गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासळी तपासण्यासाठी आता एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी ही जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय संस्था कौन्सिल आॅफ इंडिया या केंद्रीय संस्थेच्या सहयोगाने काम करणार आहे. त्यासाठी लवकरच आल्तिनो येथे प्रयोगशाळा उघडण्यात येणार असून फिरत्या व्हॅनमधूनही मासळीची तपासणी केली जाईल. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथील मंत्रालयात सोमवारी (22 ऑक्टोबर) दुपारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, अन्न व औषध प्रशासन संचालिका ज्योती सरदेसाई, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच एफडीएचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, मासळी, फळे, भाजीपाला तसेच अन्य अन्नपदार्थांच्या बाबतीत दर्जा कायम राहावा. आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही हानिकारक पदार्थ किंवा वस्तू जनतेला खावे लागू नयेत यासाठी या आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत घेतली जात आहे. जपान, कोरिया, अमेरिका आदी विकसित देशांमध्ये ही संस्था दर्जा प्रमाणीकरण करते.
गोव्यात आयात होणा-या मासळीमध्ये फॉर्मेलिन रसायन आढळून आल्याने गेल्या जुलैमध्ये खळबळ उडाली होती त्यानंतर काही काळ आयातीवर बंदीही घालण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता मासळी तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत घेतली जाणार आहे.
आॅनलाइन तक्रार करण्याची सोय
विशेष म्हणजे मासळीच्या बाबतीत किंवा अन्य कोणत्याही पदार्थांच्या बाबतीत तक्रार असल्यास गोमंतकीयांना आता आॅनलाइन तक्रार सादर करता येईल आणि त्याची तात्काळ दखल घेतली जाईल अन्नपदार्थांचा दर्जा बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, मासळीवरील आयात बंदी हा तोडगा होऊ शकत नाही. गोव्यातील जनतेला सुरक्षित मासळी मिळावी यासाठी कायमस्वरूपी तोडगा येणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची मदत घेतली जात आहे गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिल्लीत मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली होती त्यानंतर केंद्राचे पथक गोव्यात देऊन पाहणी करून गेले होते आता आंतरराष्ट्रीय संस्था मासे तपासाच्या कामात सहभाग देणार असल्याने लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही.
दरम्यान, आयात मासळीतील फॉर्मेलिन तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी नेमणे हा आणखी एक घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याआधीच केला आहे. मासळी आयातीवर बंदीच आणली जावी, अशी पक्षाची मागणी आहे.
तामिळनाडू,आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात आयात होणा-या मासळीत फॉमेर्लीन वापरले जाते आणि ते मानवी आरोग्याला धोकादायक असूनही सरकार कारवाईबाबत कोणती पावले उचलत नाही, असा आरोप आहे.
अशी आहे पार्श्वभूमी
आयात मासळी टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मेलिन रसायनाचा वापर केला जातो. हे रसायन मानवी आरोग्यास धोकादायक आहे. गेल्या १२ जुलै रोजी मडगाव येथे घाऊक मासे बाजारात हा प्रकार आढळून आल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली होती. फॉमेर्लीन हे रसायन मानवी पार्थिव सडू नये यासाठी मृतदेहावर लावले जाते. या रसायनाचा वापर मासळी टिकविण्यासाठी केला जात आहे. आणि ते अत्यंत धोकादायक आहे.