गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ, 'इन्वेस्ट गोवा २०२४' परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उद्योजकांना हाक
By किशोर कुबल | Published: January 29, 2024 02:33 PM2024-01-29T14:33:05+5:302024-01-29T14:33:30+5:30
'इन्वेस्ट गोवा २०२४' परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका. किनाऱ्या पलीकडेही येथे बरेच काही आहे. गोव्याकडे आर्थिक शक्तीगृह म्हणून पहा. येथे औद्योगिक गुंतवणूक करून गोव्याबरोबरच तुम्हीही मोठे व्हा.'
पणजी : गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे सांगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देश -विदेशातील उद्योजकांनी राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन केले आहे.
'इन्वेस्ट गोवा २०२४' परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका. किनाऱ्या पलीकडेही येथे बरेच काही आहे. गोव्याकडे आर्थिक शक्तीगृह म्हणून पहा. येथे औद्योगिक गुंतवणूक करून गोव्याबरोबरच तुम्हीही मोठे व्हा.'
दोनापॉल येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये भरलेल्या या परिषदेत व्यासपीठावर माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की,' उद्योग विस्ताराच्या बाबतीत गोवा आता फार दूर नाही. ' मेक इन इंडिया' सारखी 'मेक इन गोवा' संकल्पना रुजवू आणि गोव्यात औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणू.'
या परिषदेत राज्य सरकार ४०० हून अधिक प्रतिनिधींसमोर गोवा हे एक आकर्षक व्यवसाय गंतव्यस्थान आहे असे भक्कम मांडेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गुंतवणूकदारांशी वन-टू-वन बैठक घेणार आहेत. या परिषदेचा भर लॉजिस्टिक आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती या दोन क्षेत्रांवर आहे, ज्यामध्ये गोव्याचे उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय गुंतवणूक आणू इच्छित असून रोजगार निर्माण करू पहात आहे.
आठ वैद्यकीय उपकरण निर्मात्यांनी इन्व्हेस्ट गोवा मध्ये सहभाग घेतलेला आहे.
उद्योजकांनीच मानसिकता बदलावी - श्रीनिवास धेंपो -
याप्रसंगी बोलताना गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष तथा धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी आपल्या उद्योग समूहातर्फे वार्का येथे लवकरच २०० खोल्यांचे पंचतारांकित रिसॉर्ट येणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, राज्य सरकारने उद्योजकांसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. सरकारने काही नियमही बदलून उद्योजकांना अनुकूल असे केलेले आहेत. आता उद्योजकांनीच आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.' ते म्हणाले की, 'गोव्यात उद्योजकांसाठी विजेची कमतरता आहे त्यामुळे वीज प्रकल्पाबाबत चर्चा चालू आहे. पर्यावरणाभिमुख वीज प्रकल्पासाठी धेंपो उद्योग समूह योगदान द्यायला तयार आहे.'