अरे व्वा! पोस्टाचे बुकिंग काउंटर बारा तास खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 02:02 PM2024-02-24T14:02:21+5:302024-02-24T14:07:46+5:30
पणजी आणि म्हापशातील कार्यालयात मिळणार सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा विभागच्या पणजी आणि म्हापसा पोस्ट ऑफिसमधून सर्वप्रकारच्या वस्तूंच्या बुकिंगच्या कॉंटर तासांची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे. येत्या २८ फेब्रुवारीपासून सुरुवातीच्या टप्प्यात पणजी मुख्य पोस्ट ऑफिस आणि म्हापसा पोस्ट ऑफिसमधून या सेवा प्रदान करण्याचा हेतू आहे.
ग्राहकांना आता ९.३० वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत नोंदणीकृत, स्पीड पोस्ट, पार्सल वस्तूंच्या बुकिंगसाठी पणजी मुख्य पोस्ट ऑफिस आणि म्हापसा पोस्ट ऑफिसमध्ये सहज प्रवेश करू शकतात. फक्त रविवार आणि इतर सार्वजनिक सुटीवगळता कामकाजाच्या दिवसांमध्ये त्याचा लाभ मिळेल. पणजी मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल पॅकेजिंग सुविधादेखील उपलब्ध आहे, असे पोस्ट ऑफिसेसच्या वरिष्ठ अधीक्षकांनी पत्रकात नमूद केले आहे.
टपाल खात्याने आपल्या सुविधा गतिमान केल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून कर्मचाऱ्यांपर्यंत देण्यात आले आहेत. कार्यालय लोकाभिमूख करण्याचा प्रयत्न पोस्ट खात्याने केला आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या सोयी वाढविणे आणि ग्राहकांच्या मौल्यवान मेलचे जलद प्रसारण करणे हा आहे. पणजी हेड पोस्ट ऑफिस आणि म्हापसा पोस्ट ऑफिसमधून या सुविधेचा लाभ घेण्याचे मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो. या दोन ठिकाणांना प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा सेवेचा विस्तार राज्यात इतर ठिकाणी करण्यात येणार आहे, असे पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधीक्षकांनी म्हटले आहे.