गोव्यात आता घरगुती गॅसचा थेट पाईपलाईनने पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 07:44 PM2019-07-01T19:44:14+5:302019-07-01T19:44:23+5:30

घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी बुकिंग करा, सिलिंडर घरी येईपर्यंत वाट पहा, तुम्ही घरी नसाल, तेव्हा कंपनी सिलिंडर परत नेते.

Now supply gas to domestic gas directly in Goa | गोव्यात आता घरगुती गॅसचा थेट पाईपलाईनने पुरवठा

गोव्यात आता घरगुती गॅसचा थेट पाईपलाईनने पुरवठा

Next

- धनंजय पाटील
पणजी : घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी बुकिंग करा, सिलिंडर घरी येईपर्यंत वाट पहा, तुम्ही घरी नसाल, तेव्हा कंपनी सिलिंडर परत नेते. त्यावेळी पुन्हा बुकिंग करा, घरी आलेले सिलिंडर लिकेज असेल तर तक्रार नोंदवा, या गोष्टी लवकरच इतिहासजमा होणार आहेत. कारण स्वयंपाकाचा गॅस आता एका बटनावर तुम्हाला घरच्या घरी थेट पाईपलाईनने उपलब्ध होणार आहे.
गोमंतकीयांना ही बाब काहीशी अतिशयोक्तीची वाटेल; परंतु उत्तर गोव्यात भूमिगत पाईपलाईनमधून घरोघरी गॅसजोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यात सध्या फोंडा शहर आघाडीवर असून कुंडई औद्योगिक वसाहतीसह या परिसरात तब्बल एक हजार आस्थापने आणि घरांना गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. ताळगाव परिसरामध्ये अनेक घरकुल संकुले आणि मोठ्या इमारतींमध्ये फ्लॅटना गॅस जोडण्या देण्याचे काम सुरू झाले आहे.
गेल आणि बीपीसीएल यांच्या कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट कंपनी सध्या उत्तर गोव्यात कार्यरत आहे. दक्षिण गोव्यात या कामाचे कंत्राट अदानी कंपनीला मिळाले आहे. मात्र, गोव्यातील बऱ्याच लोकांना या प्रकल्पाविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. मात्र, एकदा ही सुविधा सुरू झाली, की लोकांमध्ये याचे आपोआप आकर्षण निर्माण होईल. सध्या देशात बंगळुरू, मुंबई या शहरांमध्ये सर्रास वाहिनीद्वारे गॅसपुरवठा होतो, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.
----------------
- ही जोडणी मिळविण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि कमी खर्चिक आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
- गॅसजोडणी घेण्यास इच्छुक ग्राहकाला सहा हजार रुपये शुल्क आकारले जाते. यातील ५,५०० रुपये ही अनामत रक्कम म्हणून ठेवली जाते. उर्वरित ५०० रुपये प्रकल्प शुल्क म्हणून आकारले जातात. जेव्हा कोणाला ही जोडणी नको असेल, त्यावेळी ही अनामत रक्कम परत दिली जाते.
- रस्त्यांमधील भूमिगत वाहिनीमधून घरामध्ये एका छोट्या वाहिनीतून गॅसपुरवठा केला जातो. या जोडणीसाठी कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- त्यासाठी ग्राहकाचे पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, रेशन कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र द्यावे लागते.
- ज्या घरात ही जोडणी घ्यायची आहे, त्या घराचे खरेदीखत, पाणी बिल, लाईट बिल किंवा सोसायटीचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक दस्तऐवज महत्त्वाचा आहे.
- जर एखाद्या भाडेकरूला ही जोडणी घ्यायची असेल, तर त्यांना घरमालकाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे.
हा गॅस वापरण्यासही अत्यंत निर्धोक आहे. हा गॅस फोम बेसमध्ये असून जोडणी घेताना घरामध्ये ठिकठिकाणी व्हॉल लावले जातात. जेणेकरून दुर्घटनाग्रस्त स्थितीमध्ये गॅसगळती थांबविणे सोपे जाईल. तसेच प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ गॅस पुरवठा करणाºया कंपनीचे हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक असलेली पाटी लावण्यात येते. संभाव्य दुर्घटनेवेळी या क्रमांकांवर संपर्क साधून मदत मागविता येते.
शिवाय फोंडा आणि ताळगाव येथे लवकरच कंपनीची कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.
---------------
‘‘हा गॅस सिलिंडरमधील गॅसपेक्षा स्वस्त आहे. प्रत्येक घरात स्वतंत्र मीटर बसविण्यात येत आहे. त्यावरून गॅसचा वापर किती झाला, हे समजते. हा गॅस युनिटमध्ये मोजला जातो. एका युनिटमध्ये ८०० ग्रॅम गॅस असतो. एका युनिटसाठी २८ रुपये दर आकारला जातो.
- दीक्षित पटेल, कंत्राटदार

‘‘उत्तर गोव्यामध्ये आमच्या कंपनीला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत फोंडा आणि ताळगाव येथे गॅस जोडण्या देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रत्यक्ष गॅसपुरवठा सुरू होईल. लोकांमध्ये या सुविधेविषयी पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे. मात्र, लवकरच आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचू.
- जिशू जेकब, प्रकल्प अधिकारी, गोवा नॅचरल गॅस प्रा. लि.

Web Title: Now supply gas to domestic gas directly in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.