शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत थांबण्याची सक्ती; गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 01:37 PM2022-07-11T13:37:51+5:302022-07-11T13:39:01+5:30
रेमेडियल वर्ग हे विशेषतः शिक्षणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी आहेत. हे वर्ग सर्वच विद्यालयांना सक्तीचे आहेत.
पणजी - शिक्षकांना रेमेडियल वर्ग घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यात कोणत्याही पद्धतीची सूट मिळणार नाही. यामुळे आता शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत शाळेत थांबावे लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
रेमेडियल वर्ग हे विशेषतः शिक्षणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी आहेत. हे वर्ग सर्वच विद्यालयांना सक्तीचे आहेत. सरकारी, अनुदानीत आणि विना अनुदानीत शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी हे वर्ग सक्तीचे आहेत. आता या शिक्षकांनी रेमेडियल वर्गाच्या सक्तीच्या विरोधात तक्रारी केल्या तरी त्यांच्या तक्रारी घेऊ नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित आमदारांना केले. कारण हा शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यात तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
बाणावलीचे आमदार वेन्सी वीएगश यांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. केवळ रेमेडियल वर्ग घेतले म्हणून शिक्षणाचा दर्जा वाढत नाही. प्राथमिक इयत्तेपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः शिक्षक भरतीकरतानाच त्याची खबरदारी घेतली पाहिजे. भरती केलेले शिक्षक हे सक्षम नसेल तर काही फायदा नाही, असे विएगश यांनी सांगिले. तसेच अनुदानित विद्यालयांच्या बाबतीत साधन सुविधांच्या सुसज्जतेसाठी अधिक अनुदान देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कारण शिक्षण क्षेत्राची सर्वाधिक धुरा ही अनुदानित शाळा वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा ऑफद रिकॉर्ड देणग्या घेतात -
विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून विद्यालयांना देणग्या घेणे हे बेकायदेशीर आहे. तरीही काही अनुदानीत शैणिक संस्थांकडून अनाधिकृतरीत्या अशा देणग्या घेण्याचे प्रकार आढळून आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कदाचित या देणग्या त्या सस्था विद्यार्थ्यांसाठीही वापरत असतील, परंतु सक्तीच्या देणग्या घेणे बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले.