आता दोघा-तिघांना निलंबित केल्याशिवाय पर्याय नाहीच!: रमेश तवडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 08:28 AM2023-11-08T08:28:28+5:302023-11-08T08:29:17+5:30
पोळे चेकनाक्यावरील अनागोंदी कारभाराची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण : पोळे चेकनाक्यावर तैनात असलेले विविध खात्याचे कर्मचारी चिरीमिरी घेतात. नुकताच हा प्रकार आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणला होता. याची सभापती रमेश तवडकर गंभीर दखल घेत दोघा- तिघांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.
पोळे चेकनाक्यावरील घटनेची गंभीर दखल घेऊन काल श्रीस्थळ विश्रामगृहात काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी चेकनाक्यावर चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत जाणून घेताना दोन-तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.
या बैठकीत वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रमोद शिरवईकर, आरटीओ रवींद्र सातार्डेकर, पोलिस उपनिरीक्षक स्वदेश देसाई, अबकारी निरीक्षक शांबा नाईक, श्रीस्थळ सरपंच सेजल गावकर, खोतीगावचे सरपंच आनंदु देसाई, पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर, लोलयेचे चंद्रकांत सुधीर, आगोंदचे सरपंच प्रीटल फर्नाडिस, नगरसेविका अमिता पाणी, सारा देसाई, नगरसेवक गंधेश मडगावकर, भाजप सरचिटणीस दिवाकर पागी, विशांत गावकर, महेश नाईक, दिनेश नाईक, शांबा देसाई, सभापतींचे खासगी सचिव सिद्धार्थ देसाई, नागेश कोमरपंत, विनय तुबकी, आनंद देसाई, कुशवंत भगत आदी उपस्थित होते.
तवडकर यांनी पोळे चेकनाक्यावर ड्युटी घेण्यासाठी कशी शर्यत लागते यासंबधी माहिती दिली. चेकनाक्यावरील कारभारासंबधी गोव्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या प्रकरणी योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल. येत्या अधिवेशनाआधी ही बैठक घेऊन पुढील कृती केली जाईल, असे तवडकर यांनी सांगितले.
चेकनाक्यामुळे होतेय बदनामी
पोळे चेकनाक्यावर नियुक्त करण्यात आलेले विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी सध्या कर्तव्य कसूर करू लागले आहेत. त्यामुळे या चेकनाक्यावरून बेकायदेशीपणे वाहतूक सुरु आहे. हीच दारून पुढे जाऊन पकडली जाते, त्यामुळे येथील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चेकनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीमुळे आपले नाव बदनाम होत असल्याची खंत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे येथील कर्मचायांवर आता कारवाई करण्याची वेळ आल्याचे ते बैठकीत म्हणाले. आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी चेकनाक्यावरील कारभाराचा भांडाफोड केल्यानंतर येथील प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.