आता रात्रीही करा 'कदंब'ने प्रवास; २० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:06 AM2023-05-19T11:06:12+5:302023-05-19T11:07:34+5:30
दळणवळण सुविधा अद्ययावत करणार: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात यापुढे रात्रीचीही कदंब बससेवा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. रात्री ९ किंवा १० नंतरही बसगाड्या उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पेट्रोल पंपवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
कदंब महामंडळासाठी २० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे मुख्यमंत्र्यांहस्ते लोकार्पण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंबचे चेअरमन आमदार उल्हास तुयेंकर, महापौर रोहित मोन्सेरात या प्रसंगी उपस्थित होते. प्रवाशांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे रात्रीच बससेवा अनिवार्य बनली आहे. थोडा तोटा सहन करावा लागला तरी चालेल परंतु रात्रीची बससेवा आम्ही सुरु करु खाजगी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. पुढील मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही प्रक्रिया गतीने मार्गी लागेल. रात्रीच्यावेळी प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाईल.'
मुख्यमंत्री म्हणाले की, कदंब महामंडळासाठी १०० इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार आहेत. वर्षअखेरपर्यंत या बसगाड्यांची संख्या १९८ वर जाईल. सध्या ज्या ५१ इलेक्ट्रिक बसेस आहेत त्या आतापर्यंत ५४ लाख किलोमिटर धावल्या असून त्यामुळे कार्बन उत्सर्जन बय्राच प्रमाणात कमी झाले आहे. नव्या इलेक्ट्रिक बसेस दिव्यांगभिमुख आहेत.
या ठिकाणी मिळणार सेवा
शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहतींमध्ये बससेवा सुरु केली जाईल. केंद्र सरकारकडून निधी मिळवून वास्को, मडगांव, पणजी आदी बसस्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल नजीकच्या काळात आणले जातील, असे सावंत म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, मोबाइल अॅपद्वारे बसचे वेळापत्रक, तिकिटासाठी क्यूआर कोड, सेल्फ तिकीट, मोबाइल अॅपद्वारे तिकीट इत्यादीसारख्या एआय पॉवरवर चालणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रणालीची अंमलबजावणी करण्याची सरकारची योजना आहे.