गोव्यात आता टॅक्सींना धोक्याची सूचना देणारे बटन, येत्या आठवड्यात प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 09:07 PM2017-12-01T21:07:52+5:302017-12-01T21:08:12+5:30
राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.
पणजी : राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.
गेले काही दिवस वाहतूक खाते तांत्रिक व्यवस्थेला अंतिम स्वरुप देण्यासाठी काम करत होते. डिजीटल मिटर लवकर लावण्याची सूचना न्यायालयानेही वाहतूक खात्याला केली आहे. राज्यात एकूण 20 हजार टॅक्सी आहेत. यात पर्यटक टॅक्सी, पिवळ्या- काळ्या आणि अन्य टॅक्सींचा समावेश होतो. गोव्यातील टॅक्सींकडे मीटर नसल्याने आपली फसवणूक व लुबाडणूक होते अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार पर्यटकांकडून येत होत्या. यापुढे अशा तक्रारींना वाव राहणार नाही, असे खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. कारण डिजीटल मीटरसोबत प्रिंटर आणि जीपीएस व्यवस्थाही येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोव्यातील टॅक्सींना आता धोक्याची सूचना देणारा बटण असेल. कुणालाही टॅक्सीमध्ये धोका वाटला तर तो बटण दाबता येईल. त्या बटणावरील कॉल हा पोलिसांच्या शंभर क्रमांकाला कळविला जाईल. ती टॅक्सी आता कुठे पोहचली आहे. जीपीएस व्यवस्थेमुळे पोलिसांना कळू शकेल, असे वाहतूक खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. डिजीटल मीटर, प्रिंटर, पॅनिक बटण आणि जीपीएस व्यवस्था एकाच यंत्रत उपलब्ध होईल. देशात अन्य कुठच्याच राज्यांमध्ये अशी व्यवस्था नाही असे अधिका-यांनी सांगितले.
ज्या उत्पादक कंपनी डिजीटल मीटरवर वॉरंटी देईल, विक्रीनंतरची सेवा देईल व राज्यात अनेक ठिकाणी ज्या कंपनीचे काऊंटर्स असतील अशा कंपनीला वाहतूक खात्याकडून डीजीटल मीटर बसविण्याचे काम दिले जाणार आहे. येत्या आठवडय़ात इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागितल्यानंतर त्यापैकी एकाची निवड केली जाईल.
दरम्यान, वाहनधारकांच्या घरी टपालाद्वारे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बूक) आणि वाहन परवाना पाठविण्याची जी व्यवस्था तीन महिन्यांपूर्वी वाहतूक खात्याने सुरू केली, ती चांगल्या प्रकारे चालत आहे, असे अधिका-यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांत पन्नास हजार वाहनधारकांना अशा प्रकारे आरसी बूक व परवाने पाठविले गेले. फक्त दोन टक्के परत आले. पत्ते नीट नसल्याने काहीवेळा असे होते, असे सांगण्यात आले.