गोव्यात चार्टर्ड फ्लाईटची संख्या घटली
By admin | Published: June 11, 2016 06:11 AM2016-06-11T06:11:13+5:302016-06-11T06:11:13+5:30
गोव्यात उतरणाऱ्या चार्टर्ड फ्लाईटची संख्या लक्षणीय घटल्यामुळे पर्यटनाला फटका बसला
पणजी : गोव्यात उतरणाऱ्या चार्टर्ड फ्लाईटची संख्या लक्षणीय घटल्यामुळे पर्यटनाला फटका बसला असून पणजीच्या एकमेव डाबोलीम विमानतळावर अधिकाधिक विमाने उतरावी यासाठी या राज्याने केंद्राकडे कर कमी करण्याची मागणी केली आहे.
गेल्यावर्षी चार्टर्ड विमानांची संख्या ३० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे पर्यटन उद्योगाची चिंता वाढली आहे. विदेशी पर्यटकांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाल्याकडे गोवा पर्यटन संघटनेचे(टीटीएजी) अध्यक्ष साव्हिओ मेस्सिआस यांनी लक्ष वेधले. या संघटनेच्या शिष्टमंडळाने हा मुद्दा केंद्र सरकारकडे लावून धरण्याचे ठरविले आहे. विमानतळावर विमानांच्या रात्रीच्या मुक्कामाला जागा (पार्किंग) नसल्यामुळे चार्टर्ड विमान कंपन्यांना समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे या कंपन्या गोव्याला विमाने उतरवत नाहीत, असे ते म्हणाले.
चार्टर्ड विमाने येणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. आम्ही त्यांना सुविधा पुरविल्यास विमानांच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. भारतीय नौदलाने विमानांच्या पार्किंगसाठी अतिरिक्त जागा द्यावी अथवा जुन्या विमानतळाच्या इमारतीत आणखी जागा निर्माण केली जावी, असेही मेस्सिआस यांनी सुचविले. (वृत्तसंस्था)
हॉटेलचे बिल, विमान पार्किंग महागडे...
अलीकडे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आल्यामुळे हॉटेलमधील कामगारांच्या पगारावरील खर्चात ६० ते ७० टक्के वाढ झाली आहे. त्याचा एकूणच परिणाम हॉटेलिंग महागण्यात झाला आहे. कामगारांच्या किमान वेतनात झालेली वाढ आम्ही मनावर घेतलेली नाही मात्र राज्य सरकारची प्रस्तावित करवाढ डोईजड होणारी आहे. गोवा विमानतळावरील पार्किंगसाठी चार्टर्ड विमानांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे गोव्यातील पर्यटन महागडे असल्याचा ठप्पा लागला आहे. केंद्र सरकारने विमान कंपन्यांना सबसिडी दिल्यास त्याचा लाभ पर्यटकांना होईल, असे टीटीएजीने स्पष्ट केले आहे.