खाण घोटाळ्यातील 300 कोटींची वसुली, मुख्यमंत्र्यांची गोवा विधानसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 03:20 PM2018-07-25T15:20:17+5:302018-07-25T15:23:31+5:30
खाण घोटाळ्यात झालेली 35 हजार रुपयांची लूट वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
पणजी : खाण घोटाळा प्रकरणात लुटीची भरपाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना आतापर्यंत 300 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिली.
काँग्रेसचे आमदार लुईझीन फालेरो यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला हा मुद्दा उपस्थित केला होता. खाण घोटाळ्यात झालेली 35 हजार रुपयांची लूट वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राज्य सरकारनेही आपल्या प्रतिज्ञापत्रात वसुलीची कारवाई सुरू करण्यात आल्याचे म्हटले होते. किती लूट वसूल केली त्याची माहिती देण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. केली नसेल तर केव्हा करणार आणि किती करणार असे प्रश्न त्यांनी विचारले.
यावर उत्तर देताना खाण खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आतापर्यंत 300 कोटी रुपयांची वसुली केल्याचे संगितले. नेमकी लूट ही शहा आयोगाने सांगितलेल्या रक्कमेपेक्षा फार कमी आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चाटर्ड अकाउंन्टटच्या नेमणुकाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहा आयोगाच्या नोंदीनुसार 578 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केल्याची माहितीही चुकीची आहे. फक्त 10 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.