चार्टर विमानांची संख्या घटली; युक्रेन, रशिया संघर्षाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2024 08:15 AM2024-04-09T08:15:51+5:302024-04-09T08:16:27+5:30
गेल्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत २.८१ लाखांहून अधिक परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : युक्रेन आणि रशिया, गाझा आणि इस्त्रायल यांच्यातील प्रदीर्घ संघर्ष यामुळे गोव्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. रशियन पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रशिया आणि इस्रायल या दोन देशांमधून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या कमी झाली आहे.
गेल्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत २.८१ लाखांहून अधिक परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. त्याआधीच्या दोन वर्षांपूर्वीच्या (२०२१) च्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढ होती. कोविड महामारीनंतर केवळ २२००० परदेशी पर्यटकांनी किनारपट्टी राज्याला भेट दिली होती. २०१८ व २०१९ मध्ये दरवर्षी सरासरी ९ लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती.
रशियन विमानांच्या आगमनामध्ये दर आठवड्याला सहा इतकी मोठी घट नोंदवली गेली आहे. जी एकेकाळी दिवसातून चार उड्डाणे होती. इंग्लंडमधून येणाऱ्या चार्टर विमान संख्येतही घट झाली आहे. एकेकाळी हंगामात ८०० ते ९०० चार्टर विमाने येत असत. एका माहितीनुसार २०१९ साली ९,३७, ११३ परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. नोव्हेंबर २०२३ मध्ये ही संख्या घसरून ४,०३,४०४ वर आली. २०१९ मध्ये तब्बल ८०,६४,४०० देशी पर्यटक गोव्यात आले. २०२० मध्ये ते २९,७१,७२६ पर्यंत घसरले.
पर्यटकांना सतावतात समस्या
दुसरीकडे असे दिसून आले आहे की, विदेशी पर्यटक गोव्याऐवजी आता थायलंड, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, तुर्कस्तान आणि व्हिएतनाम आदी देशांमध्ये इतर स्थळांचा शोध घेत आहेत. व्हिसा ऑन अराय- व्हलची समस्या, प्रचंड लैंडिंग शुल्क आणि अपुऱ्या पर्यटन पायाभूत सुविधा यासारख्या समस्यांमुळे परदेशी पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवत आहेत.