'एसटी' आमदारांची संख्या वाढणार; मंत्री गोविंद गावडे यांची 'लोकमत' कार्यालयास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:00 PM2023-12-05T13:00:32+5:302023-12-05T13:01:48+5:30

सरकारकडून योग्य पाठपुरावा.

number of st mla will increase minister govind gawade visit to lokmat goa office | 'एसटी' आमदारांची संख्या वाढणार; मंत्री गोविंद गावडे यांची 'लोकमत' कार्यालयास भेट

'एसटी' आमदारांची संख्या वाढणार; मंत्री गोविंद गावडे यांची 'लोकमत' कार्यालयास भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेत एसटी समाजाच्या आमदारांची संख्या वाढणार असल्याचा विश्वास कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल व्यक्त केला. शक्य तेवढ्या लवकर एसटींना विधानसभा आरक्षण मिळायलाच हवे. अगदी उद्याच मिळाले तरी त्याचे स्वागतच होईल. एसटींचा हा घटनात्मक अधिकार आहे आणि त्यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

'लोकमत' कार्यालयास गावडे यांनी भेट दिली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी केल्याबाबत लोकमततर्फे गावडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुलाखत रंगली. विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना मंत्री गावडे म्हणाले की, एसटींना विधानसभेत आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. गोव्याचे काही सरकारी अधिकारी हा आरक्षण विषय जोरात पुढे नेत नाहीत. अधिकाऱ्यांकडूनही आवश्यक त्या प्रमाणात यावर काम होत नाही. एसटी आमदारांची संख्या गोव्यात वाढणारच आहे. राज्य सरकार एसटी समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मी स्वतः ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत एसटी समाजाला आरक्षण मिळणारच, असेही मंत्री गावडे - यावेळी म्हणाले.

'लोकमत'ने साथ दिली

राज्यात ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करून दाखविण्यामागे अनेकांचा हातभार आहे. क्रीडा खात्याच्या मैदान कर्मचारी ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचाच यात वाटा आहे. परंतु आयोजनापूर्वी स्पर्धा होणार की नाही, याबाबत शंका होती. सगळीकडे नकारात्मक वातावरण होते. केंद्रापर्यंत या नकारात्मकतेची हवा
होती. अनेकजण जाणूनबुजून नकारात्मक बातम्या देत होते; पण 'लोकमत'ने या कठीण काळात माझी साथ सोडली नाही. माझ्यावर विश्वास ठेवला आणि या नकारात्मकातून वाट काढत सकारात्मकतेकडे नेण्याची सुरुवात 'लोकमत'ने केली. कुठलीही स्पर्धा सफल होण्यास माध्यमांचाही मोठा हातभार असतो आणि 'लोकमत'ने ते दाखवून दिल्याचे मंत्री गावडे म्हणाले.

६१ दिवस तुरुंगात होतो

एकेकाळी एसटींच्या विविध मागण्यांसाठी मी आंदोलनांमध्ये सहभागी झालो. ६१ दिवस मला तुरुंगात रहावे लागले. एसटी समाजावर वेळोवेळी अन्याय झालेला आहे. विधानसभा आरक्षणाचा महत्त्वाचा विषय असून २०२७ पर्यंत ते हमखास मिळेल आणि विधानसभेत एसटी आमदारांची संख्या वाढेल, याची मला ठाम खात्री आहे.

भाजपने योग्य उमेदवार द्यावा

दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला यश मिळेल, असा दावा एका प्रश्नावर त्यांनी केला. गावडे म्हणाले की, भाजपने दक्षिणेत योग्य उमेदवार द्यायला हवा. अर्थात पक्षाचे नेते त्याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच, योग्य उमेदवार दिला तर मतांची आघाडी वाढेल. राज्य सरकारने जी विकासकामे केली आहेत त्याचा भाजप उमेदवाराला फायदा होईल. उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपकडे तशी सक्षम यंत्रणाही आहे. तसेच म्हापसा येथे रवींद्र भवनाचे काम प्राधान्यक्रमे होणार आहे. पेडणेंतही रवींद्र भवन होईल. काणकोणचे रवींद्र भवन जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

खुल्या नाट्यगृहाच्या डिझाइनचे काम सुरू

दरम्यान, कला अकादमीच्या खुल्या नाट्यगृहासाठी डिझाइन तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चालू असल्याची माहिती गावडे यांनी एका प्रश्नावर दिली. खुले नाट्यगृह २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस चालू रहावे यासाठी तशी व्यवस्था केली जाईल. व्यावसायिकदृष्ट्या त्यासाठी मोठी मागणी आहे, असे गावडे यांनी सांगितले.

 

Web Title: number of st mla will increase minister govind gawade visit to lokmat goa office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.