एसटीच्या आरक्षणाला आता ओबीसीचा पाठिंबा; आचारसंहितेपूर्वी राजकीय आरक्षण देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:26 PM2024-03-07T14:26:03+5:302024-03-07T14:26:18+5:30
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या एसटी बांधवांना पाठिंबा देत आम्ही तुमचा सोबत आहोत तुम्हीही आम्हाला पाठिंबा द्यावा असे सांगितले.
नारायण गावस
पणजी: आचारसंहितेपूर्वी राजकीय आरक्षण द्या या मागणीसाठी पणजी आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या एसटी समाजाच्या बांधवांना आता ओबीसी महासंघाने आपला पाठिंबा दर्शविला. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या एसटी बांधवांना पाठिंबा देत आम्ही तुमचा सोबत आहोत तुम्हीही आम्हाला पाठिंबा द्यावा असे सांगितले.
मधू नाईक म्हणाले, एसटी समाज ओबीसीचा एक भाग आहे संविधानानुसार त्यांना त्यांचा अधिकार मिळायला हवा. सरकार त्यांना असे ताटकळत ठेऊ शकत नाही. एसटी ओबीसी समाजाची लाेकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांना त्यांचे याेग्य अधिकार दिले जात नाहीत. आज एसटी समाज जागृत झाला ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येत आहेत. तसेच ओबीसी समाजाने आपऱ्या मागण्यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. या दोन्ही समाजांनी एकमेकांना पाठिंबा दिला तर सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागणार आहे, आमचा पूर्ण पाठिंबा हा एसटी समाजाला आहे असे ते म्हणाले.
एसटी समाजाचे नेते रामा काणकोणकर म्हणाले, एसटी समाजला फक़्त आश्वासने देऊन फसविले आहे. गेली २० वर्षे राजकीय आरक्षणासाठी मागणी करत आहोत. भाजपने २०१४ साली फसविले तसेच २०१९ आमची फसवणूक केली आता २०२४ तोच प्रकार होणार आहे. म्हणून आम्हाला आचारसंहितेपूर्वी राजकीय आरक्षणाची अधिसूचना जारी केलेले हवी. जर तसे झाले नाही तर आता येणाऱ्या निवडणूकीत एसटी समाजाजवळ १ लाख ८० हजार मते आहेत ती कुणाला द्यायची हे आमचा समाज ठरविणार आहे. आम्ही मांड घेऊन यावर चर्चा करणार. आमच्या एसटी समाजाच्या भाजप सरकारमधील मंत्री आमदारांना आमचे पडले आहे तर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असेही काणकोणकर म्हणाले.