ओबीसींना वाढ, एसटींना धक्का
By admin | Published: September 25, 2015 02:13 AM2015-09-25T02:13:30+5:302015-09-25T02:13:42+5:30
पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांच्या येत्या २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासन खात्याने गुरुवारी प्रभाग आरक्षण जाहीर केले.
पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांच्या येत्या २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासन खात्याने गुरुवारी प्रभाग आरक्षण जाहीर केले. आरक्षणातील बदलामुळे ओबीसींना नऊ जागा वाढवून तर अनुसूचित जमातींना (एसटी) सहा जागा या वेळी कमी करून मिळाल्या आहेत. प्रथमच अनुसूचित जातींना एकूण तीन जागा आरक्षित करून मिळाल्या आहेत. दरम्यान, अनुकूल आरक्षणासाठी भाजप सरकारने मॅच फिक्सिंग केल्याची टीका विरोधकांनी केली.
राज्यातील अकरा पालिकांमध्ये आजपासून (दि.२५) आचारसंहिता लागू होत आहे. पालिका प्रभाग आरक्षण अधिसूचना जारी करण्यास शासकीय पातळीवरून खूप विलंब करण्यात आला. अधिसूचना गुरुवारी दुपारी जारी करण्यात आली. या वेळी प्रथमच ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे २०१०च्या तुलनेत आता नऊ जागा जास्त मिळाल्या आहेत.
अनेक नगरसेवकांचे पत्ते गुल
मडगाव, मुरगाव, म्हापसा, कुंकळ्ळी, कुडचडे, केपे, काणकोण, पेडणे, डिचोली, सांगे आणि वाळपई या पालिकांच्या निवडणुका होत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांचे पत्ते गुल झाले आहेत. अकरा पालिकांच्या एकूण १५९ प्रभागांपैकी ८९ जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. उर्वरित जागा महिला, ओबीसी, ओबीसी महिला, एसटी व एससींसाठी आरक्षित झाल्या आहेत. महिलांना एकूण ४९ प्रभाग आरक्षित करून मिळाले आहेत. त्यात सोळा ओबीसी महिला प्रभागांचा समावेश आहे. मडगाव, कुडचडे, केपे, कुंकळ्ळी व सांगे या पालिकांमध्ये एसटींना एकूण सात जागा आरक्षित करून दिल्या आहेत.
(खास प्रतिनिधी)