प्रभाग निश्चितीवर इच्छुकांचा आक्षेप; नगरपालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 12:54 PM2023-03-04T12:54:49+5:302023-03-04T12:55:16+5:30

सदरच्या बाबीवरून कुणीही कोर्टात गेल्यास नगरपालिका निवडणूक लांबणीवरसुद्धा पडू शकते.

objection of aspirants to ward determination and municipal elections likely to be postponed in goa | प्रभाग निश्चितीवर इच्छुकांचा आक्षेप; नगरपालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

प्रभाग निश्चितीवर इच्छुकांचा आक्षेप; नगरपालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

googlenewsNext

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क,  फोंडाः आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंधराही प्रभागाचे फेरसीमांकन केले असून, सदरच्या फेररचनेवर काही इच्छुक उमेदवारांनी आक्षेप घेतला असून, अन्यायाविरुद्ध कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सदरच्या बाबीवरून कुणीही कोर्टात गेल्यास नगरपालिका निवडणूक लांबणीवरसुद्धा पडू शकते.

रचनात्मक बदलांचा परिणाम

सविस्तर वृत्तानुसार एकूण १५ प्रभागांसाठी एप्रिल किंवा मेमध्ये निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रचनात्मक बदल करण्यात आले असून, त्यामचा मसुदा मामलेदार कार्यालयात ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर नवीन मतदार याद्याही संदर्भासाठी ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने पूर्वीचेच १५ प्रभाग ठेवले आहेत.

हे तर्कात कुठेच बसत नाही

लोकसंख्या वाढल्यामुळे प्रभाग वाढतील, असे वाटले होते. प्रभागांचा अभ्यास केला असता जे काही बदल करण्यात आले आहेत, ते तर्कामध्ये कुठेच बसत नाहीत. मागील निवडणुकीत जी मते अमुक  एका प्रभागात होती, ती काढून वेगळ्याच प्रभागात टाकण्यात आली आहेत. इथेच संशयाला वाव मिळतो.

प्रशासनाने कुठल्या बाबीवर सदर बदल केले आहेत, ते पटत नाही. उदाहरणार्थ, प्रभाग एकमधील मते प्रभाग दोनमध्ये. प्रभाग दोनमधील मते थेट प्रभाग ९ मध्ये फिरवण्यात आली आहेत. तीनमधली नऊमध्ये चार प्रभागातील प्रभाग तीनमध्ये, प्रभाग पाचमधील प्रभाग सहामध्ये, प्रभाग आठमधील प्रभाग सातमध्ये, इतर प्रभागांमध्येसुद्धी भौगोलिक सीमा लक्षात न घेता सीमांकन व फेररचना करण्यात आली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चांना उधाण आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

व्यंकटेश नाईक, शिवानंद सावंत व विन्सेंट फर्नाडिस यांना बसणार आहे. या तिघांनीही हॅटट्रिक केली असून, चौथ्या विजयासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली होती. विन्सेत यांच्या प्रभागाला लांबवर असलेले आयडी रुग्णालय, फॉरेस्ट कॉलनी जोडण्यात आलेली आहे. मध्ये इतर प्रभाग येत असताना दूरवरची मते इथे कशी आली, ही चर्चा आता सुरू झाली आहे. - व्यंकटेश नाईक

सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आमची धास्ती घेतली

'रायझिंग फोडा'ने मागच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना घाम फोडला होता. यावेळीसुद्धा आमच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे; परंतु सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आमची धास्ती घेतली आहे व आमच्या ज्या काही नगरसेवकांनी चांगले कामे करून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले होते, त्यांची मते काढून भलतीकडे टाकलेली आहेत. प्रत्येक प्रभागातील हक्काची अशी किमान ३०० ते ४०० मते इतरत्र वळवण्यात आली आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारांना फायद्याचे राहावे याचा विचार करून ती इतरत्र टाकण्यात आली आहेत. हा सारासार अन्याय असून फोंडा नगरपालिका बचाव' या बॅनरखाली आम्ही पुढच्या तीन दिवसांत नगरपालिकेतील प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी संपर्क साधणार आहोत व आमच्यावर झालेला अन्याय त्यांना पटवून देणार आहोत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आमचा विश्वास असून निदान त्यांनी लक्ष घालून जो काही अन्याय झाला आहे, तो दूर करावा. कुठल्या बाबीवर मते कापण्यात आली आहेत, त्याचा जरा अभ्यासही करावा. - डॉ. केतन भाटीकर

प्रशासनाने चूक सुधारावी

सदरची फेररचना ही अन्यायकारक आहे. जे माजी नगरसेवक आहेत व ज्यांनी आपल्या प्रभागांमध्ये चांगले काम केले आहे, त्यांची जी काही हक्काची मते आहेत, ती जाणूनबुजून काढून जुळत नसलेल्या भलत्याच प्रभागांमध्ये घुसडण्यात आली आहेत. ज्या कुणाच्या दबावाखाली प्रशासनाने हा प्रकार केलेला आहे, तो चुकीचा असून प्रशासनाकडे अजूनही वेळ आहे. त्यांनी आपली चूक सुधारावी. - विन्सेत फर्नाडिस, माजी नगरसेवक

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: objection of aspirants to ward determination and municipal elections likely to be postponed in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा