'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या टीमला गोव्यात आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 04:46 PM2021-05-01T16:46:02+5:302021-05-01T16:50:26+5:30
Aai Majhi Kalubai : सोनी मराठी टीव्ही चॅनलवर सध्या अलका कुबल निर्मित 'आई माझी काळुबाई' ही मालिका चालू आहे. या मालिकेचे काही भाग गोव्यात चित्रित होणार आहेत.
पणजी - 'आई माझी काळुबाई' या मराठी मालिकेच्या चित्रीकरणासाठी गोव्यात आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री तथा मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आठल्ये आपल्या चमूतील कलाकार व तंत्रज्ञांसह कळंगुट येथे ज्या सोसायटीत फ्लॅटमध्ये उतरल्या होत्या तेथे काही लोकांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ निर्माण झाला परंतु नंतर प्रत्यक्ष चित्रीकरण तेथे होणार नसल्याचे समजल्यावर विरोध मावळला. सोनी मराठी टीव्ही चॅनलवर सध्या अलका कुबल निर्मित 'आई माझी काळुबाई' ही मालिका चालू आहे. या मालिकेचे काही भाग गोव्यात चित्रित होणार आहेत. त्यासाठी कलाकार तंत्रज्ञ व इतर मिळून ३५ जणांचा गट गोव्यात आला आहे.
निर्मात्या अलका कुबल यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,' कळंगुट येथे एका सोसायटीत आम्ही भाड्याने फ्लॅट घेतलेले आहेत आणि तेथे आम्ही उतरलो आहोत. २० जणांचा गट एकीकडे आणि १५ जण दुसरीकडे उतरले आहेत. प्रत्यक्ष चित्रीकरण हणजुण येथे किनाऱ्यावर असलेल्या एका व्हिल्लामध्ये होणार आहे. आमचे युनिट शुक्रवारी गोव्यात आले. अजून चित्रीकरण सुरू व्हायचे आहे. सोमवारी गोव्याचे लॉकडाऊन उठल्यानंतरच आम्ही चित्रीकरण करणार आहोत. गोव्यात चित्रीकरणाला मनाई नाही. मनोरंजन संस्था तसेच इतर यंत्रणांकडून आम्ही आवश्यक ते परवाने घेतलेले आहेत. गोव्यात इतर मालिकांचे चित्रीकरणही सध्या सुरू आहे. परंतु ती मंडळी सेट झालेली आहे. आम्ही कालच आलो असल्याने चित्रीकरण सोमवारनंतरच करण्याचा निर्णय घेतला.
हणजुण येथे व्हिल्लामध्ये कुणालाही बाहेर त्रास होणार नाही अशा पद्धतीने बंगल्यात चित्रीकरण होणार आहे. आमचा कोणीही माणूस बाहेर रस्त्यावर दिसणार नाही. कोविड महामारीची जाणीव आम्हालाही आहे, आम्ही सर्व नियम पाळूनच चित्रीकरण करणार आहोत, असे कुबल म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, कळंगुट येथे एका सोसायटीमध्ये आम्ही उतरलो होतो. तेथे एक- दोन वयस्कर रहिवाशांनी आम्हाला आक्षेप घेतला पण त्यानंतर त्यांना आम्ही समजावून सांगितले की शूटिंग अन्य ठिकाणी होणार आहे. त्यानंतर ते शांत झाले. गोव्याचे नियम पाळूनच आम्ही चित्रीकरण करणार आहोत, असे त्या म्हणाल्या. हणजुण येथे पुण्यातील एका व्यक्तीचे पाच-सहा बंगले आहेत ते आम्ही भाड्याने घेतलेले आहेत तेथे चित्रीकरण होईल. कळंगुटला सोसायटीत फक्त आमचे वास्तव्य असेल. तेथे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊ असे त्यांनी सांगितले.