लोटलीत मिळाला गोव्यातील जुन्या खेळांना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 05:49 PM2019-02-25T17:49:00+5:302019-02-25T17:50:20+5:30

चाळीस-पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट. ज्यावेळी शाळेत जाणा-या मुलांवर आताप्रमाणे मोबाईल व व्हिडिओ गेम्सनी गारुड केले नव्हते.

old games in Goa | लोटलीत मिळाला गोव्यातील जुन्या खेळांना उजाळा

लोटलीत मिळाला गोव्यातील जुन्या खेळांना उजाळा

Next

 मडगाव - चाळीस-पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट. ज्यावेळी शाळेत जाणा-या मुलांवर आताप्रमाणे मोबाईल व व्हिडिओ गेम्सनी गारुड केले नव्हते. अशावेळी मुले मोकळ्या अंगणात विटी-दांडू, लगो-या, काठ्यांचे खेळ, गोटय़ांचे खेळ खेळत असत. दोन दिवसांपूर्वी लोटलीतील बिग फूट प्रकल्पात पुन्हा हा जुना माहोल जमून आला. गेम्स ऑफ गोवा या महोत्सवातून विद्यार्थी व पर्यटकांना गोव्यातील कित्येक जुन्या खेळांचे दर्शन घडले आणि त्यामुळे काहीजणांच्या रम्य अशा जुन्या आठवणीही जाग्या झाल्या.

सध्याच्या धावपळीच्या जगात गोव्यातील जे पूर्वीचे खेळ हरवत चालले होते त्या जुन्या खेळांना लोटलीतील बिग फूट प्रकल्पात उजाळा प्राप्त झाला. गेम्स ऑफ गोवा या महोत्सवातून जुन्या काळी गोव्यात खेळल्या जाणा-या वेगवेगळ्या खेळांचा आनंद या प्रकल्पाला भेट देणा-या विद्यार्थ्यांनी आणि पर्यटकांनी लुटला.

मागचा शनिवार-रविवार असे दोन दिवस हा अनोखा महोत्सव संपन्न झाला. लगोरी, गड्डय़ांनी, तांबला, टिक्टे, कोयणो बाल, बडयांनी, रिंगांनी अशा वेगवेगळ्या खेळांचा प्रेक्षकांनी आनंद घेतला. या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक होता. आजर्पयत ज्या खेळांची त्यांनी फक्त नावेच ऐकली होती. ते खेळ त्यांना या महोत्सवात प्रत्यक्षात खेळता आले.



दत्तप्रसाद शेटकर यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, आमच्या लहानपणी आम्ही जे खेळ खेळायचो ते आताची मुले खेळत नाहीत. जुने खेळ हे शारीरिक व मानसिक शक्तींना चालना देण्याचे काम करत होते. मात्र आधुनिकतेच्या लाटेमुळे हे खेळ आपले अस्तित्व हरवून बसले. आम्ही आमच्या लहानपणी खेळ खेळताना जी मजा केली तीच आताच्या मुलांना का करता येऊ नये हा विचार पुढे आल्यानेच या महोत्सवाचे आयोजन करण्याचे आम्ही ठरविले.

शेटकर यांनी आयोजीत केलेला हा महोत्सव म्हणजे नुसते क्रीडा प्रकार नव्हते तर त्यामागे त्यांनी एक शास्त्रीय दृष्टीकोनही ठेवला होता. हे जे जुने खेळ आहेत त्याची नियमावली तयार करुन ती या महोत्सस्थळी लावण्यात आली होती. त्याशिवाय हे खेळ नेमके कसे खेळतात याचे चित्रीकरण करुन माहितीपटाच्या माध्यमातून त्यांनी ते प्रेक्षकांसमोर आणल्यामुळे लोकांनाही या जुन्या खेळांची इत्यंभूत माहिती प्राप्त करता येणो शक्य झाले होते.



वास्तविक सुरुवातीला हा महोत्सव कांपाल-पणजीच्या एसएजी मैदानावर आयोजीत केला होता. मात्र ऐनवेळी हे मैदान मिळण्यास अडचणी आल्यामुळे हा महोत्सव लोटलीला हलविण्यात आला. वास्तविक जुन्या खेळांना उजाळा देण्याचे महत्वाचे काम आयोजकांतर्फे करण्यात येऊनही त्यांना शासकीय पातळीवर कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही.

या महोत्सवाबद्दल शेटकर यांच्याशी संपर्क साधला असता, जुन्या खेळांना उजाळा देण्याचे काम हे आता वर्षभर चालणार असून, जुन्या खेळांची तयार केलेली नियमावली आणि चित्रीकरण घेऊन आम्ही गोव्यातील शैक्षणिक आस्थापनात जाणार आहोत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या जुन्या खेळांचा प्रसार करण्यासाठी आमचे प्रयत्न हे वर्षभर चालू राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.

Web Title: old games in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा