जुने गोवेंचे प्रसिद्ध फेस्ट फ्रान्सिस झेवियरचे सोमवारपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 03:31 PM2018-12-02T15:31:34+5:302018-12-02T15:32:18+5:30
जुने गोवे येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त सोमवारपासून (3 डिसेंबर) हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जाईल.
पणजी : जुने गोवे येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त सोमवारपासून (3 डिसेंबर) हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जाईल. त्यासाठी भाविकांची जुने गोवेकडे रीघ लागली आहे. मुंबईचे बिशप फादर बार्थाेल बार्रेटो सोमवारी सकाळी १0.३0 वाजता मुख्य प्रार्थनेच्यावेळी भाविकांना संबोधताना शांती, सलोख्याचा संदेश देतील. गोवा, दमण दिवचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव हेही यावेळी उपस्थित असतील.
पहाटे ४ वाजल्यापासून प्रार्थना सुरू होतील. सकाळी 9 वाजेपर्यंत तासातासाने प्रार्थना होतील. सकाळी १0.३0 वाजता मुख्य प्रार्थना होईल. मुख्य प्रार्थना सभेला मंत्रि, आमदार व इतर महनीय उपस्थित राहणार आहेत. या फेस्तनिमित्त गेल्या २४ तारीखपासून ‘नोव्हेना’ (प्रार्थना) सुरु झाल्या. ‘नोव्हेना’ नऊ दिवस चालतात. लाखो भाविकांची उपस्थिती या एकूण काळात अपेक्षित असल्याचे बासिलिका चर्चचे फादर पेट्रीसियो फर्नांडिस यांनी सांगितले.
शेजारी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक या फेस्ताला येतात. कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, नेसर्गी, मधवाल, देसनूर भागातून चालत यात्रेकरु ख्रिस्ती भाविक गोव्यात येतात. त्यांच्यासाठी मराठी, कन्नड तसेच विदेशी भाविकांसाठी स्पॅनिश व फ्रेंच भाषेतूनही प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चच्या आवारात तीन भव्य व्यासपीठे तयार केली आहेत. एलईडी आणि भव्य स्क्रीन्सची व्यवस्था आहे. टीव्ही चॅनल्स, यु-ट्युबवर मुख्य प्रार्थनेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. फादर पेट्रीसियो म्हणाले की, यंदा फेस्तात प्लाास्टिकचा कमीत कमी वापर यावर भर देण्यात आला आहे.
या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ‘गोंयचो सायब’ म्हणून ओळखल्या जाणा-या सेंट फ्रान्सि झेवियरचे ४00 वर्षांपूर्वीचे पार्थिव येथे जतन करुन ठेवले असून ते जशाचे ते अद्याप जसेच्या तसे असल्याची भाविकांची भावना आहे. दर दहा वर्षानी ही पार्थिव भाविकांसाठी प्रदर्शनासाठी खुले केले जाते. २0१४ साली प्रदर्शन झाले आता दहा वर्षांनी म्हणजेच २0२४ साली पुन: प्रदर्शनासाठी ठेवले जाईल. फेस्तानिमित्त जुने गोवे भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.