गोव्यातील आगोंद-गालजीबाग किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 603 पिलांचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:16 PM2019-04-09T19:16:43+5:302019-04-09T19:17:14+5:30
काणकोण तालुक्यातील आगोंद आणि गालजीबाग या किनारपट्टीवरील 18 ठिकाणी कासवांनी आपली अंडी घातल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत वन खात्याने 603 कासवांची पिल्ले पाण्यात सोडली आहेत.
मडगाव - पर्यावरण प्रेमीसाठी आणि विशेषत: कासव संवर्धन मोहिमेत रस घेणाऱ्यांसाठी खुशखबर! गोव्याच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचे आगमन यावेळी काहीसे उशिरा झालेले असले तरीही आतापर्यंत काणकोण तालुक्यातील आगोंद आणि गालजीबाग या किनारपट्टीवरील 18 ठिकाणी कासवांनी आपली अंडी घातल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत वन खात्याने 603 कासवांची पिल्ले पाण्यात सोडली आहेत.
दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील आगोंद हा किनारा कासव पैदासीसाठी देशातीलच नव्हे तर आशियातील मुख्य किनाऱ्यांपैकी एक असून, आतापर्यंत 18 ठिकाणी या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणा-या या समुद्री पर्यटकांनी 2000 पेक्षा अधिक अंडी घातली आहेत. मागच्या वर्षी एकूण 19 ठिकाणी कासवांनी अंडी घातली होती. यातून 1317 पिल्ले जन्माला आली होती.
वन खात्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, 2016-17 हे वर्ष कासव प्रजोत्पादनासाठी महत्वाचे ठरले होते. त्यावर्षी आगोंद व गालजीबाग या किनारपट्टीवर एकूण 28 ठिकाणी अंडी घालण्यात आली होती. विभागीय वन अधिकारी विक्रमादित्य गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आगोंद किना-यावरील 18 अंडी घातलेल्या जागेपैकी सहा जागांतून 516 कासवांची पिल्ले पाण्यात सोडण्यात आली तर गालजीबागच्या तीन पैकी एका जागेत घातलेल्या अंडय़ातून 87 पिल्ले बाहेर आली.
यंदा नेहमीपेक्षा या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी कासव उशिरा आले होते तरीही आतापर्यंत 2461 अंडी घातली असून या अंडय़ांची वन खाते डोळ्यात तेल घालून निगराणी करत आहे. उन्हाळा संपेपर्यंत या किनारपट्टीवर कासवे अंडी घालण्यासाठी येणार असल्याची माहिती संबंधित सुत्रकडून मिळाली. पावसाळ्यात कित्येकदा कासवे किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी क्वचितच येत असतात. ही अंडी उबवण्यासाठी जर योग्य असे गरम वातावरण असेल तरच ही कासवे पावसाळय़ात अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात अन्यथा येत नाहीत, असे सांगण्यात आले.