ओम प्रमाणपत्र मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढवणार: तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह
By समीर नाईक | Published: June 29, 2024 03:59 PM2024-06-29T15:59:37+5:302024-06-29T15:59:54+5:30
याबाबतची माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.
समीर नाईक / पणजी: देशात सर्वत्र जिहाद आणि हलाल या गोष्टींची हवा केली जात आहे. हलाल पूर्वी मासंपूर्तीच मर्यादीत असायचा, परंतु आता हे उद्योेगपर्यंत पोहचले आहे. थूक जिहाद, लव जिहाद यासारख्या गोष्टी आता वाढत आहे. या आता आमच्या मंदिरापर्यंत पोहचल्या आहेत. मंदिरातील प्रसाद देखील आता असुरक्षीत झाला आहे, या अनुषंगाने मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढावी, यासाठी आम्ही ओम प्रमाणपत्र संकल्पना राबविणार आहोत, अशी माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.
पणजीत शनिवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत टी. राजा सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे, ॲड. विष्णू जैन, व गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी उपस्थित होते.
थूक जिहादच्या माध्यमातून फुलांवर थूंकून विकली जात आहे. गायीच्या चरबीपासून बनवलेल्या खवा, पेढा, मावा हे प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहेत. हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक आस्थेवर मोठा आघात आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसाद शुद्धीसाठी ओम प्रमाणपत्रे वितरित करणे सुरु झाले आहे. हिंदु दुकानदारांना ओम प्रमाणपत्र विनामूल्य दिले जाणार आहेत. देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ओम प्रमाणपत्रे अवश्य घ्यावे, असे आवाहन राजा सिंह यांनी केले.
हलाल प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे. देशात एफएसएसआय हे सरकारमान्य प्रमाणपत्र आहे. पण आता याच्यावर हलाल प्रमाणपत्र आले आहे. २०१३ साली एका मुस्लिम संघटनेनेे सुरु केलेले हलाल प्रमाणपत्रातून केवळ दहा वर्षात जगभरातून २.१ यूएस ट्रिलियन डॉलर निधी उभारला आहे, आणि हा सर्व पैसा केवळ आतंंकवादी घडामोडीसाठी वापरण्यात येत आहे. ही हिंदू राष्ट्रच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, त्या अनुषंगाने ओम प्रमाणपत्र खुप आवश्यक ठरणार आहे, असे यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी सांगितले.
हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत; मात्र पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे ही मंदिरे जीर्ण झाली आहे. ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत. ही मंदिरांची सरकारने योग्य देखभाल करावी, अशी मागणी ॲड. विष्णू जैन, यांनी केली.