...तर प्रसंगी पोलिसात तक्रार दाखल करु, महापौरांनी घेतली पणजीतील स्मार्ट सिटी कामांची पाहणी
By पूजा प्रभूगावकर | Published: January 5, 2024 03:18 PM2024-01-05T15:18:35+5:302024-01-05T15:20:25+5:30
स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात उत्पल पर्रीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौर मोन्सेरात यांनी शुक्रवारी पणजीत सुरु असलेल्या या कामांची जाऊन पाहणी केली.
पणजी: स्मार्ट सिटीच्या कामांमुळे एका तरुण मुलाचा जीव जाणे हे अत्यंत गंभीर आहे. या कामांबाबत कुठलीही ढिलाई खपवून घेतली जाणार नसून प्रसंगी कंत्राटदारदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करु असा इशारा पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिला आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात उत्पल पर्रीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौर मोन्सेरात यांनी शुक्रवारी पणजीत सुरु असलेल्या या कामांची जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या कामांबाबत तीव्र संताप व्यक्त करुन कंत्राटदारांनी पुढील दोन दिवसांत सुरक्षा उपायोजना हाती घ्यावेत असे असे निर्देशही दिले.
महापौर म्हणाले, की स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील सर्वच रस्ते फोडले आहेत. या कामांसाठी पाच वेगवेगळे कंत्राटदार नेमले असून त्यांच्याकडे स्वत:चे असे वेगवेगळे आराखडे आहेत.खड्डे खोदले त्याठिकाणी बॅरीकेड लावले असले तरी ते पत्र्याचे आहेत. त्यामुळे जर कुणी धडकले तरी तो हमखास जखमी होईल. स्मार्ट सिटीची कामांमध्ये सर्वच घोळ सुरु असल्याचे दिसून येत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कुठलीही खबरदारी घेतली नसल्याची टीका त्यांनी केली.