गोळीबार करुन खून केल्याच्या आरोपातून संशयित निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 05:44 PM2019-09-09T17:44:57+5:302019-09-09T17:46:17+5:30
प्रत्यक्षदर्शी नसल्याने संशयाचा फायदा
मडगाव: दोन वर्षापूर्वी दारुच्या नशेत एकाचा गोळी झाडून खून केल्याचा आरोप असलेल्या फैयाज अहमद खतीब विरोधात कुठलेही ठोस पुरावे समोर न आल्याने दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नाडिस यांनी त्याला निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात संशयिताच्यावतीने ऍड. अमेय प्रभूदेसाई यांनी बाजू मांडली.
26 सप्टेंबर 2017 रोजी दवर्ली येथील गुदिन्हो कूल स्पोर्ट्स बारमध्ये ही घटना घडली होती. मडगाव पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राप्रमाणे दारुच्या नशेत असलेल्या संशयिताने अब्दुल कादर वालीकर याचा गोळी झाडून खून केला होता. या खूनासाठी वापरलेली बंदूक त्याला अकबर शेख याने दिली होती. ही बंदूक बेकायदेशीर होती आणि संशयिताने ती अकबरकडून कुणाला तरी विकण्यासाठी घेतली होती. या प्रकरणात पोलिसांनी अकबर शेख यालाही अटक केली होती.
घटना घडल्यानंतर मडगाव पोलिसांना शरण जाण्यासाठी निघालेल्या संशयिताला एक हजार रुपये देऊन पळून जाण्याचा सल्ला अकबरने दिला होता. यामुळे अकबर याच्या विरोधात गुन्हेगाराला सहाय्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मडगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी तपास केला होता. एकूण 12 साक्षीदार न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. मयत कादर याच्या डाव्या कानशिलावर गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात म्हटले होते.
मात्र संशयित फय्याज कादरच्या डाव्या बाजूला बसला होता हे सिद्ध करणारी कुठलीही साक्ष न्यायालयासमोर येऊ शकली नाही. एवढेच नव्हे तर फय्याजला प्रत्यक्ष गोळी झाडताना कुठल्याही साक्षीदाराने पाहिले नव्हते. नेमका याच गोष्टीचा फायदा संशयिताला मिळाला. साक्षीदारांनी आपण केवळ गोळी झाडल्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतर आरोपी पळून जात असल्याचे पाहिले अशी साक्ष न्यायालयासमोर दिली होती. संशयिताचे वकील अॅड. प्रभुदेसाई यांनी आरोपी पळून जात असल्याचे पाहिले म्हणून गोळी त्यानेच झाडली हे निसंदिग्धपणो सिद्ध होत नाही असा केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानत संशयिताला संशयाचा फायदा दिला.