युवतीची अश्लील छायाचित्रे सोशल मिडियावर टाकणा-या युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 02:57 PM2018-03-21T14:57:44+5:302018-03-21T16:44:50+5:30
आपल्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन काणकोण येथील एका युवतीशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याच्या तसेच त्या युवतीचे नग्नावस्थेतील चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली...
मडगाव - आपल्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन काणकोण येथील एका युवतीशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याच्या तसेच त्या युवतीचे नग्नावस्थेतील चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली काणकोण पोलिसांनी एका युवकाला बलात्कार, विनयभंग तसेच आयटी कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. सदर युवकाला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला.
या व्हिडिओ व्हायरल प्रकरणाची एका स्वयंसेवी संघटनेने दखल घेऊन हे प्रकरण काणकोण पोलिसांर्पयत पोचविले होते. 2016 पासून या युवकाचे त्या युवतीशी संबंध होते. त्यादरम्यान हे चित्रिकरण केले होते. हल्लीच त्या दोघांचे संबंध बिघडले होते. सदर युवकाने आपल्या इच्छेविरुद्ध आपली अश्लील छायाचित्रे काढली. आपण त्याला विरोध केल्याने ही छायाचित्रे त्याने सोशल मिडियावर टाकली. त्या युवकाचा ससेमिरा सुटण्यासाठी आपण मोबाईल फोनही बदलला पण आपला नवीन मोबाईल नंबर मिळवून घेऊन त्या युवकाने आपला लैंगिक छळ चालूच ठेवल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.