भूमिगत वीज वाहिन्यांच्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थ संतप्त
By आप्पा बुवा | Published: August 12, 2024 04:34 PM2024-08-12T16:34:02+5:302024-08-12T16:34:25+5:30
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकाचा जीव गेला हे समजताच स्थानिकानी घटनास्थळी धाव घेतली व निदर्शने सुरू केली.
फोंडा - भूमिगत वीज वाहिण्यासाठी खोदण्यात आलेल्या खंदकात पडून जांबोली मोले येथे एका इसमाचा मृत्यू होण्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. सविस्तर वृत्तानुसार मोले पंचायत क्षेत्रात ठिकठिकाणी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. जांबोली येथे सदर कामासाठी जो खंदक खोदण्यात आला होता तो तसाच ठेवण्यात आलेला होता. मोले येथील राजू भट( वय 60) हे ज्येष्ठ नागरिक मोले बाजारातून आपल्या घरी जात होते. त्यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या एका वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात राजू भट हा थेट त्या खंदकात पडला.
सदर अपघात घडला त्यावेळी त्या परिसरात काळोख असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळेच खोदून ठेवलेल्या खंदकाचा अंदाज राजू भाट ह्याला आला नाही. राजू भट हा त्या खंदकात पडल्याचे निदर्शनास येताच लोकांनी लगेचच पोलिसांना सदर माहिती दिली. जखमी अवस्थेत राजू भट याला अगोदर पिळेये येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्याला अधिक उपचाराची गरज असल्याचे नजरेस येतात त्वरित गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. मात्र अर्ध्या वाटेवरच राजू भट याला मृत्यू आला. कुळे पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा
भूमिगत केबल टाकण्याचे काम चालू असल्याने, सध्या जोडण्या देण्याचे काम चालू आहे. सदरचा खड्डा हा रविवारी सकाळीच खोदण्यात आला होता. काम झाल्यानंतर सदरचा खड्डा हा बुजवायला हवा होता. मात्र कंत्राटदाराने अपघाताची माहिती मिळताच सकाळी साडे पाच वाजता सदर खड्डा बुजवून घेतला. निदान खड्ड्याच्या बाजूला चांगले बॅरिकेट्स लावून घेतले असते तरी राजू भट याचा जीव वाचला असता .परिसरात असलेले इतर धोकादायक खंदक सुद्धा काम झाल्यानंतर बुजवण्यात यावे अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे.
ग्रामस्थांचे आंदोलन
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकाचा जीव गेला हे समजताच स्थानिकानी घटनास्थळी धाव घेतली व निदर्शने सुरू केली. परिस्थितीची माहिती मिळताच कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सगुण सावंत यांनी आपल्या पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्थानिक जास्तच आक्रमक झाले होते. कंत्राटदाराला किंवा सरकारी अभियंत्यांना घटनास्थळी दाखल करा असा आग्रह लोकांनी धरला. त्यावेळी पोलीस व ग्रामस्थांमध्ये चांगली बचाबाची सुद्धा झाली. शेवटी कंत्राटदाराचा एक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर त्याच्यावर लोकांनी प्रश्नाचा भडिमार सुरू केला. लोकांच्या रोषास तो बळी पडला. त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करून ग्रामस्थांना रोखून धरल्याने कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांला कोणती इजा झाली नाही.
अपघातात मृत्यू पावलेला राजू भट हा गरीब घराण्यातला आहे. त्याच्या मागे त्याचे कुटुंबीय आहे तेव्हा त्याला नुकसान भरपाई म्हणून 15 लाख रुपये देण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. शेवटी मध्यस्थी करून कंत्राटदाराने दहा लाख रुपये तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.