संगीताच्या मोठ्या आवाजामुळे एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By पूजा प्रभूगावकर | Published: December 31, 2023 05:58 PM2023-12-31T17:58:52+5:302023-12-31T17:59:00+5:30
कांदोळी येथील प्रकार : स्थानिकांमध्ये संताप.
पणजी: कांदोळी येथील एका कल्बमध्ये लावलेल्या मोठया संगीताच्या आवाजामुळे सदर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार २९ डिसेंबर राेजी कांदोळी येथील एका कल्बमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. नियमांनुसार रात्री १० वाजल्यानंतर मोठयाने संगीत लावले जावू शकत नाही. मात्र सदर क्लबने सर्व नियम धाब्यावर बसवून संगीत लावणे सुरुच ठेवले. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना लोकांची झोपमोड तर झालीच पण आरोग्याचीही समस्या उद्भवली.
सदर संगीत रात्री उशीरा पर्यंत सुरु होते.अशातच या मोठयाने लावलेल्या संगीताच्या आवाजामुळे एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने स्थानिक सांगत आहे. या विषयी संबंधीत सरकार यंत्रणांकडे तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ज्या क्लबमुळे हा सर्व प्रकार घडला त्याकडून भविष्यात आणखीनही अशाच प्रकारचे कार्यक्रम होतील अशी जाहिरातबाजी केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.