आंघोळीसाठी तळयात उतरला असता बुडून एकाचा मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Updated: May 22, 2024 20:56 IST2024-05-22T19:43:02+5:302024-05-22T20:56:17+5:30
कोंंजे कुडतरी येथे आज बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आंघोळीसाठी तळयात उतरला असता बुडून एकाचा मृत्यू
मडगाव: आंघोळीसाठी तळयात उतरला असता बुडून एकाचा मृत्यू होण्याची घटना गोव्यातील सासष्टीतील कुडतरी येथे घडली. मयताचे नाव कामिलो परेरा (४७) असे आहे. कोंंजे कुडतरी येथे आज बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वरील दुदैवी घटना घडली. मयत याच सिनाईभाट कुडतरी येथील रहिवाशी आहे. ते तळे त्याच्या घरापासून काही अंतरावर आहे. नेहमी तो या तळयात आघोंळ करीत होता. नित्यनेमाप्रमाणे बुधवारी तो तेथे आला व त्याने पाण्यात बुडकी मारली. जवळच एक मानस असून, तेथील एकाने त्याला भरतीचा वेळ असून, पाण्याचा प्रवाहही जोरदार असल्याने तळयात उतरु नको असा सल्ला दिला होता. मात्र कामिलोने त्याकडे दुर्लक्ष केले.
तळयात उतरल्यानतंर काही वेळानंतर तो पाण्यात गटांगळया खाउ लागला व बुडाला. स्थानिकांनी लागलीच ही माहिती मायणा कुडतरी पोलिस ठाण्याला दिली. नंतर मडगाव अग्निशामक दलालाही बोलावण्यात आले. दलाचे जवान व स्थानिकांनी मागाहून पाण्यातून कामिलोचा मृतदेह बाहेर काढला. मयत विवाहित असून, त्याला पत्नी व दोन मुली आहेत. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा कुडतरी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक पुढील तपास करीत आहेत. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला असून, उदया गुरुवारी शवचिकित्सा होणार आहे.