शिकारीसाठी गेलेल्या इसमाच्या बंदुकीची गोळी लागून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 07:42 PM2020-03-11T19:42:06+5:302020-03-11T19:42:12+5:30
उत्तर गोव्यातील व्हावटी वाठादेव (डिचोली) येथे रानात शिकरीसाठी गेलेल्या एका शिकाऱ्याने सावजावर झाडलेली गोळी दुसऱ्या इसमास लागल्याने संतोष गोवेकर (५५) हा व्हावटी वठादेव येथील इसम ठार झाला.
डिचोली : उत्तर गोव्यातील व्हावटी वाठादेव (डिचोली) येथे रानात शिकरीसाठी गेलेल्या एका शिकाऱ्याने सावजावर झाडलेली गोळी दुसऱ्या इसमास लागल्याने संतोष गोवेकर (५५) हा व्हावटी वठादेव येथील इसम ठार झाला. या प्रकरणी गोळी झाडणारा आनंद यशवंत गावडे (३९) हा डिचोली पोलिसांना शरण आला व त्याने बंदुकीसह पोलिसांना घडलेल्या प्रकारची कबुली दिली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी आनंद यशवंत गावडे यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवताना भादंस ३०२ कलमाखाली तसेच बंदूक बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष गोवेकर व आनंद गावडे हे दोघेकला सायंकाळी एकत्र आले व साडेसहाच्या सुमरास व्हाव्हटी येथील जंगलात शिकारीसाठी गेले होते. सव्वाआठच्या सुमरास जंगलात त्यांना साळ (साळींदर) याची शिकार करण्याची संधी आली. त्यावेळी साळ एका ठिकाणी असताना आनंद गावडे हा बंदूक रोखून धरून होता, त्याच वेळी संतोष गोवेकर हा त्या सावजाला हाकलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी शिकार करण्यासाठी रोखलेल्या बंदुकीतून गोळी झाडली असता सावजाला हाकलण्याच्या प्रयत्नात संतोष गोवेकर याच्यावरच नेम लागल्याने त्याच्या डाव्या बाजूने गोळ्या (मुनीसावं) लागल्याने तो मृत झाला.
रात्री घडलेल्या या प्रकाराची माहिती आनंद गावडे यांनी आपल्या मित्राला फोनवरून दिल्यानंतर घटनास्थळी लोक दाखल झाले, त्यानंतर जखमी संतोष गोवेकर याला उचलून डिचोली इस्पितळात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर सुमारे दहा वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली. आनंद गावडे याने डिचोली पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तो बंदुकीसह २ काडतुशीही पोलिसांकडे सुपूर्द केल्या.
या संदर्भात गोवेकर यांचा पुतण्या सुशांत गोवेकर याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंदवतना आनंद यशवंत गावडे याला अटक केली आहे. डिचोली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवला आहे.
दरम्यान डिचोली पोलिसांनी आज दुपारी घटनास्थळी भेट दिली असता रक्ताने माखलेला शर्ट त्यांना आढळला तसेच त्यात खिशात दोन काडतूशी सापडल्या. यावेळी गोवा फॉरेन्सिक मोबाइल वाहनही पाचहरण करण्यात आली होती. त्यांनी रक्ताचे नमुने व ठसे गोळा केले व इतर ठसे घेतले आहेत.
पोलीस अधीक्षक उत्कृस्ट प्रसून, उपाधीक्षक गुरुदास गावडे, निरीक्षक संजय दळवी, प्रसाद पाळणी, अक्षय तिरोडकर, प्रसाद वायंगणकर, गौरव वायंगणकर, सदानंद मळीक, किशोर सिनारी, दिपेश आदींनी तपासात सहकार्य केले. वनधिकारी विवेके गोवेकर यांनीही या ठिकाणी भेट दिली.