चिंबल उड्डाणपुलाची एक लेन जूनपर्यंत सर्वांसाठी होणार खुली; आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी घेतला कामाचा आढावा
By समीर नाईक | Published: May 23, 2024 03:40 PM2024-05-23T15:40:43+5:302024-05-23T15:40:51+5:30
आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी गुरुवारी सकाळी चिंबल येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कंत्राटदार, स्थानिक पंच सदस्य व लोक उपस्थित होते.
पणजी: चिंबल येथील उड्डाणपुलाचे काम जलदगतीने सुरू आहे. पण गेल्या काही दिवसात या उड्डाणपुलाच्या कामामुळे चिंबल जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या उद्भवत आहे. याबाबत कंत्राटदाराकडे चर्चा करण्यात आली असून, जून पूर्वी उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येण्याचे आश्वासन यावेळी कंत्राटदाराने दिले आहे, अशी माहिती सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी सांगितले.
आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी गुरुवारी सकाळी चिंबल येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कंत्राटदार, स्थानिक पंच सदस्य व लोक उपस्थित होते.
पावसाळा सुरू व्हायला काही दिवसच शिल्लक राहिले आहे, अशावेळी चिंबल येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने व्हायला नको याच उद्देशाने या कामाची पाहणी करण्यात आली. ट्रॅफिक समस्या आणि अपघात रोखण्यासाठी निदान एक लेन वाहतुकीसाठी खुले असणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील या भागातील होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी चार ठिकाणी रंम्बलर्स बसविण्यात आले होते. तसेच सिग्नल, सूचना फलक व ठिकठिकाणी पोलिस उपलब्ध करण्यात आले होते, असे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी देखील मी कामाची पाहणी केली होती. या कामामुळे अवकाळी पावसातच चिंबल येथील एका प्रभागात पाणी साचले होते. त्यामुळे येथील गटार व्यवस्था नीट करण्याची सूचना करण्यात आली आहे. डिसेंबर पर्यंत या भागातील बहुतांश कामे पूर्ण करून परिसर स्वच्छ करण्यात येण्याची सूचना करण्यात आली आहे. कारण यंदा डिसेबरमध्ये सेंट. फ्रान्सिस झेवियरचे शव प्रदर्शन होणार असून या निमित्ताने पोप राज्यात येणार आहेत. तसेच सांताक्रुझ मतदारसंघातूनच जूने गोवा चर्चकडे रवाना होणार आहेत अशी माहिती फर्नांडिस यांनी यावेळी दिली.
रायबंदरच्या कामामुळे वाढली ट्रॅफिक समस्या
पूर्वी चिंबल जंक्शनवर उड्डाणपुलाचे काम सुरू होते, तरी तेवढे ट्रॅफिक होत नव्हते, पण आता गेल्या काही महिन्यात रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे, तसेच तेथील ट्रॅफिक चिंबल जंक्शन मार्गे जूने गोवा येथे वळविण्यात आल्याने ट्रॅफिक समस्या वाढली आहे, पण लवकरच ही समस्या सुटणार आहे, असेही फर्नांडीस यांनी अधीक माहिती देताना सांगितले.